- जयंत धुळप
अलिबाग - आपलं जंगल वणवामुक्त झाले असल्याने तेथील जंगलाचा पुरेपूर उपयोग आपल्याला होत असल्याबद्दल भिवघर येथील आदिवासींना पर्यावरणाचे महत्त्व समजले असून त्याकरिता ते मेहनत घ्यायला लागले आहेत. महाड येथील श्रृंखला संस्थेच्या वतीने आणि भिवघर वनमित्र संस्थेच्या सहकार्याने येथील आदिवासी महिला सिडबॉल करण्यात गुंग आहेत. आपलं जंगल वाचविणे आणि वाढविणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव सात वर्षापूर्वी भिवघरच्या ग्रामस्थांना झाली. वनप्रेमी संस्थेच्या वतीने किशोर पवार यांनी आपलं जंगल वणवामुक्त केल्याने गेल्या सात वर्षात या भिवघरच्या जंगलात अनेक वनस्पती वाढत आहेत.घनदाट जंगल व वणवामुक्त झाल्याने येथील वन्यजिवांचा संचार पाहायला मिळतो. जंगलात त्यांच्यासाठी फळांची, फुलांची, कीटकांची व लहान पक्षी व प्राण्यांचा संचार असल्याने प्रत्येकाचे खाद्य प्रत्येक वन्य प्राण्यांना मिळत आहे. या वनसंपदेत रानमेव्याची भर लक्षणीय आहे. इतर ठिकाणी वणव्यामुळे रानमेव्याचे उत्पादनच घटले आहे. परंतु रानमेव्यामुळे आदिवासींना मिळणाऱ्या रोजगारामुळे सध्या भिवघरच्या आदीवासींना वनाच्या संवर्धनाचे उपक्रम समजायला लागले. मिळालेल्या फळांच्या व झाडांच्या बियांचे सिडबाॅल करून ते जंगलात टाकण्यात येणार असल्याची माहिती किशोर पवार यांनी दिली.गेल्या आठवड्यात श्रृंखला या महाडच्या संस्थेच्या ममता मेहता यांनी येथील आदिवासींचे सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आता मोठ्या प्रमाणात सिडबाॅल तयार झाले असून यंदाच्या जून महिन्यात त्याचे रोपण करण्यात येणार आहे. सध्या भिवघरमध्ये फळांचे व जंगली वनस्पतींच्या बिया माती व शेणाच्या गोळ्यात भरण्याचे काम जोरात सुरू असून, भिवघर ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे त्यांचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे. वाढत्या जंगलामुळे भिवघर हे गाव पर्यटनासाठी सज्ज झाले आहे. सध्या वणवामुक्त गाव म्हणून संपूर्ण कोकणात महाड तालुक्यातील या भिवघर गावाचे नाव घेतले जाते. वनप्रेमी मंडळाचे अध्यक्ष किशोर पवार यांनी आपल्या गावासारखे गावे कोकणात तयार होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फक्त त्या त्या गावातील तरुण मंडळी पुढे आली पाहिजेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.