अलिबाग : आदिवासी कोळी समाज समन्वय समितीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित आदिवासी कोळी समाजाच्या राज्यस्तरीय सभेत संविधानिक अधिकारासाठी राज्यव्यापी महाआंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच भाग म्हणून येत्या २३ जानेवारीला अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे.
२३ जानेवारीला सकाळी अलिबाग कोळीवाडा येथील श्री खंडोबा मंदिरापासून हजारो कोळी बांधवांचा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल. तेथे अन्नत्याग आणि साखळी उपोषण करून कोळी समाज बांधवांच्या बाबतीत सरकारच्या धोरणांचा निषेध केला जाईल, असे समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष जयवंत पोकळे, उपाध्यक्ष जलदीप तांडेल यांनी सांगितले.
शासन किंवा प्रशासन मूळ मराठी भाषिक कोळी महादेव, कोळी मल्हार, डोंगर कोळी, कोळी ढोर व टोकरे कोळी या अनुसूचित जमातींबाबत कोणताही ठाम निर्णय घेत नाही म्हणून महाआंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे तांडेल यांनी सांगितले.
दाखले देण्याची, पडताळणी करण्याची पद्धत चुकीची जिल्ह्यातील कोळी समाजाच्या जनगणनेत फार पूर्वीपासून अनुसूचित जमातीमध्ये नोंद होते. त्यांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र दिले जात नाही किंवा ती अवैध ठरवली जातात. मुळात महसूल विभागाने दिलेले दाखले अवैध ठरवण्याचा अधिकार पडताळणी समितीला नाही. प्रांताधिकारी दाखले देतात आणि त्याची पडताळणी आदिवासी विकास विभाग करतो. दाखले देण्याची किंवा त्याची पडताळणी करण्याची पद्धत चुकीची आहे. केंद्राची नियमावली राज्य सरकर मान्य करीत नाही ही बाब कोळी समाजावर अन्याय करणारी आहे, असा दावा समन्वय समितीने केला आहे.