आदिवासी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:54 PM2019-01-28T23:54:48+5:302019-01-28T23:55:01+5:30
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य; समाज परिवर्तनाची प्रक्रिया झाली सुरू; आश्रमशाळेतील मुलांना दिले होते निमंत्रण
अलिबाग : समाजाच्या मूळ प्रवाहापासून काहीसे दूर असणाºया आदिवासी बांधवांना विशेषत: त्यांच्या नव्या पिढीला समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याची थेट जिल्हाधिकाºयांच्या बंगल्यातून सुरुवात झाली. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ते रहात असलेल्या ब्रिटिशकालीन आपल्या निवासी बंगल्यात जिल्ह्यातील विविध आदिवासी आश्रमशाळांतील मुला-मुलींना निमंत्रित करून हा बंगला पाहण्याचा,तेथे वावरण्याचा त्याचबरोबर या मुलांशी संवाद साधून अनोखा आनंद मिळवून दिला.
आदिवासी मुलांच्या या जिल्हाधिकारी बंगला भेटीच्या वेळी या मुलांना भेटलेले माजी नौदल प्रमुख एल. रामदास आणि त्यांच्या पत्नी ललिता रामदास म्हणजे या मुलांसाठी दुग्धशर्करा योगच होता. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी डॉ.आरती सूर्यवंशी यांनी बंगल्यात आलेल्या प्रत्येक आदिवासी मुलाबरोबर साधलेल्या संवादातून प्रजासत्ताकाच्या आगळ््या नात्याच्या अनोख्या संवेदनशील धाग्याची आश्वासक वीण यावेळी येथे उपस्थित मान्यवर आणि शिक्षकवृंदास अनुभवण्यास मिळाली. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी आणि माजी नौदल प्रमुख एल.रामदास यांच्या समवेत या मुलांचे सहभोजन हे देखील या मुलांसाठी मोठा आनंद देणारे ठरले. दरम्यान, जिल्ह्यातील एकमेव ऐतिहासिक अशा जिल्हाधिकाºयांच्या बंगल्याच्या भेटीच्या स्मृती रहाव्यात यासाठी आदिवासी मुलांना, शिक्षक व सर्व आश्रमशाळा सेवकांना जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या हस्ते सुंदर असे प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती आदींसह जिल्ह्यातील अन्य प्रमुख अधिकारी तसेच पेण आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे उपस्थित होते.
मुलांनी व्यक्त के ल्या भावना
आश्रमशाळेतील ही सर्व मुले आपल्या आई-वडिलांपासून दूर आश्रमशाळेत राहून शिक्षण घेत असतात. या पार्श्वभूमीवर ‘आई’ या विषयावर या सर्व मुलांना आपल्या भावना व्यक्त करण्यास यावेळी सांगितल्यावर अनेक जण आपल्या आईविषयी भरभरून बोलले, परंतु त्याचबरोबर काही मुलांनी आपल्या आईवर केलेल्या कविता सादर केल्यावर उपस्थितांच्या डोळ््यांचे कोपरे ओलावले.