आदिवासींचा प्रवास खडतर; वंजारपाडा, देवपाडा रस्ता बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 10:56 PM2019-12-13T22:56:53+5:302019-12-13T22:57:29+5:30
लोकप्रतिनिधींंसह, अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्ष
- कांता हाबळे
नेरळ : वंजारपाडा-देवपाडा तसेच पुढे अनेक आदिवासीवाड्यांना जोडणारा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने वाहन चालवणे धोकादायक बनले असून अनेक अपघात या रस्त्यावर घडत आहेत. तसेच या रस्त्यावरील वंजारपाडा येथील घाटरस्त्यावर संरक्षक कठडे नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होतआहे.
नेरळ-देवपाडा हा सुमारे दहा कि.मी.चा रस्ता असून, या रस्त्यावरील वंजारपाडा ते देवपाडा भागात तसेच पुढील आदिवासीवाड्यांना जोडणाºया रस्त्यावरील डांबराचा थर निघून गेल्याने या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले नाही, तसेच रस्त्यावरील खड्डेदेखील भरले नाहीत. त्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. त्याचा त्रास वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
याच रस्त्यावर वंजारपाडा गावालगत असणाºया घाटरस्त्यावर भारत एज्युकेशन सोसायटीचे माथेरान हॅली इंग्लिश मीडियम स्कूल आहे. यांची स्कूलबसही याच घाटरस्त्यातून ये-जा करत असते. येथे धोकादायक वळण असून रस्त्यावर खोल दरी असल्याने येथे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याला संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून अनेक वर्षांपासून होत आहे; परंतु याची दखल अद्याप ना लोकप्रतिनिधींनी घेतली ना अधिकाऱ्यांनी. निवडणुकीत आश्वासन देणारे मात्र आता गायब झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यावर डांबरीकरण करावे आणि नागरिकांना, प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी होत आहे.
नादुरुस्त रस्त्यामुळे एसटी सेवा बंद
देवपाडा, तसेच पुढील अनेक आदिवासी भागातील नागरिक नेरळ येथे येत असतात; परंतु या रस्त्यावर प्रवास करताना वाहनचालक, प्रवासी, रुग्ण, गरोदर महिला यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे नेरळ-देवपाडा एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. या रस्त्यावरून स्कूलबस, अनेक मोठमोठी खासगी वाहने, दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या खराब रस्त्यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच वारे भागातून प्रवासी या मार्गाने येत असतात.
गेल्या अनेक वर्षांपासून वंजारपाडा ते देवपाडा रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले नाही, त्यामुळे रस्त्यावरील खडी वर अली आहे.हा रस्ता धोकादायक बनला असून, छोटे-मोठे अपघात घडत आहेत. येथून प्रवास करताना प्रवासी, वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच गरोदर महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन या रस्त्यावर लवकर डांबरीकरण करावे.
- निवृत्ती झोमटे, ग्रामस्थ, देवपाडा
मागील वर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडे रस्त्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता; परंतु दहिवली ते वंजारपाडापर्यंतच रस्ता मंजूर झाला. या रस्त्याची पाहणी करण्यात आली असून, या वर्षी पुन्हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
- पी. एस. गोपणे,
शाखा अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग