कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:41 PM2018-10-28T23:41:05+5:302018-10-28T23:41:28+5:30
जांभूळवाडी, नवसूचीवाडी, हऱ्याचीवाडी रस्त्यांची दुरवस्था; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष; रस्ता नसल्याने रुग्ण, विद्यार्थ्यांचे हाल
- कांता हाबळे
नेरळ : कर्जत तालुक्यात खांडस येथील जांभूळवाडी, हºयाचीवाडी, नवसूचीवाडी या आदिवासी वाडीतील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गावात वाहन येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना डोक्यावर ओझे घेऊन पायपीट करावी लागते. याबाबत आदिवासी बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून रस्त्यांना वाली कोण, असा प्रश्न आदिवासी बांधवांना पडला आहे.
कर्जतपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर जांभूळवाडी, हºयाचीवाडी, नवसूचीवाडी या आदिवासी वस्ती असलेल्या वाड्या असून कर्जत-मुरबाड राज्य मार्गालगत असलेला कुरुंग, ताडवाडी खांडस या रस्त्याला जोडून या वाड्या पाड्यांना जोडणारे हे अंतर्गत रस्ते आहेत. सुमारे २० वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांच्या आमदार निधीतून करण्यात आले होते.
जिल्हा परिषद अंतर्गत हे रस्ते येत असून, योग्य देखभालीअभावी या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खडी उखडलेली आहे. या रस्त्यावर वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
‘गाव तेथे एसटी’ असे ब्रीदवाक्य मिरवणारे परिवहन खात्याची बस सेवाही नसल्याने येथील आदिवासींना दळणवळणाची सोय नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रथम त्यांना चार ते पाच किलोमीटर अंतर पायी चालून वारे गाव गाठावे लागते. त्यानंतरच त्यांना उपलब्ध वाहनाच्या साह्याने तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहचता येते.
अनेक आदिवासी आपल्या उपजीविकेसाठी शेती, तसेच भाजीपाला लागवड करीत आहेत. मात्र, त्यांनी कष्टाने पिकविलेला भाजीपाला विक्र ीसाठी बाजारपेठेत नेण्याकरिता खराब रस्त्याअभावी व अन्य वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने आदिवासींना बोजा डोक्यावर घेऊन मार्गक्र मण करावे लागते. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आजारी झाल्यास किंवा महिला गरोदर असल्यास आरोग्य केंद्रात नेण्याकरिता चादरीची झोळी करून चार ते पाच किलोमीटरचे अंतर पार करावयास लागत असल्याचे चित्र या भागात दिसून येते. तालुक्यातही प्रमुख रस्त्याकडे तर प्रसार माध्यमासहित प्रशासनाचेही लक्ष जाते व तातडीने रस्त्यावरील खड्डे भरून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, या वाड्या पाड्यातील अंतर्गत रस्ते मात्र दुर्लक्षितच होत आहेत. या रस्त्यांना वाली कोण ? हा प्रश्न येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.
निवडणुका आल्या की, येथील आदिवासी बांधवांवर उमेदवारांकडून आश्वासनांची खैरात केली जाते; परंतु निवडणुका झाल्या की या आश्वासनांचा विसर पडतो. त्यामुळे वर्षानुवर्षे आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित राहतात. विशेष म्हणजे आदिवासी भागात वीज, रस्ते नसल्यानेच येथील तरु ण शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात विविध पक्षाचे नेते मंडळी येणार म्हणून तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची डागडुजी केली जाते, यासाठी बांधकाम विभागाची धावपळ सुरू असते. मात्र, २० ते २५ वर्षांपासून या आदिवासी भागातील रस्त्यांवर साधी डागडुजीही होत नाही.
आदिवासी भागात गेल्या २० वर्षांपासून रस्ते चांगले झाले नाहीत. रस्त्यावर खडीही राहिलेली नाही अशी अवस्था रस्त्यांची आहे, मोटारसायकल चालवणेही कठीण झाले आहे, त्यामुळे मोठा त्रास आमच्या आदिवासी बांधवांना होत आहे. त्यामुळे शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन रस्ते तरी चांगल्या दर्जाचे करावेत.
- मारु ती पारधी,
ग्रामस्थ, जांभूळवाडी