कार्लेखिंड : वडखळ महामार्गावरील कार्लेखिंड एसटी थांब्यावर ट्रक पलटी होऊन अपघात झाला. शुक्रवारी पहाटे ४ वाजता वडखळ बाजूने येणारा ट्रक कार्लेखिंड येथील वळणावर झोला मारल्यामुळे पलटी झाला. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.एमएच ०२ बी ८७५५ हा ट्रक बारामतीहून कोंबड्यासाठी लागणारे मका खाद्य मनोली येथील पोल्ट्रीकडे घेऊन जात होता. कार्लेखिंड येथे वळण घेताना झोला मारल्याने ट्रक पलटी झाल्याचे ट्रकचालक विजय खुडे यांनी सांगितले. ट्रकमध्ये चालक व क्लीनर दोघेच होते. ट्रक पलटी झाल्याने त्यातील मक्याच्या गोणी खाली कोसळल्याने नुकसान झाले आहे. तसेच ट्रकचेही नुकसान झाले आहे. या वेळी दोघेही चालक केबिनमध्येच अडकले. मात्र, कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.वडखळहून अलिबागकडे जाणाºया रस्त्याची उंची वाढलेली आहे. कार्लेखिंड येथून रेवसकडे जाणारा मार्ग आहे, त्याची उंची खाली आहे. त्यामुळे महामार्गावरून रेवसकडे वळताना कोणतीही गाडी झोला घेते. ज्या वेळी रस्त्याचे डांबरीकरण झाले त्या वेळी त्या ठिकाणी उताराच्या दृष्टीने कोणतीही सुरक्षितता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्या ठिकाणी भाजी व मच्छीविक्रेते ठाण मांडून दिवसभर बसलेले असतात. त्यामुळे माणसांची नेहमीच वर्दळ असते. जर हाच अपघात दिवसाचा झाला असता तर तेथील विक्रेते व प्रवासी या अपघातात सापडले असते. तरी भविष्यात खबरदारी म्हणून सुरक्षिततेसाठी कोणत्याही विक्रेत्यांना बसण्यास मनाई केली पाहिजे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे; परंतु याकडे राष्टÑीय महामार्ग, वाहतूक पोलीस व ग्रा. पं. दुर्लक्ष करत आहे्.
कार्लेखिंड एसटी थांब्यावर ट्रकला अपघात, सुदैवाने मनुष्यहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 2:49 AM