'त्या' ट्रेकर्सना पाच लाखांचा विमा, सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श वस्तुपाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:05 AM2018-08-12T03:05:39+5:302018-08-12T03:05:54+5:30
गेल्या २८ जुलै रोजी पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून विद्यापीठाच्या तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा झालेला मृत्यू, या भीषण घटनेनंतर प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
- जयंत धुळप
अलिबाग - गेल्या २८ जुलै रोजी पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून विद्यापीठाच्या तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा झालेला मृत्यू, या भीषण घटनेनंतर प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्या वेळी विविध संस्था संघटनांचे ट्रेकर्स रोप, कॅराबीनर्स, हारनेस आदी गिर्यारोहणातील आपली सर्व साधनसामुग्री घेऊन सत्वर घटनासस्थळी पोहोचले आणि दोरांच्या साहाय्याने ६०० फूट खोल निसरड्या दरीत उतरून बसमधील मृतदेह दरीतून वर काढण्यास सुरुवात केली. या आंबेनळी घाट बस दुर्घटनेच्या वेळी जवळच्याच महाड शहरातील सह्याद्री मित्र संस्थेच्या १६ आणि सिस्केप संस्थेच्या २१ अशा एकूण ३७ तरुण ट्रेकर्सनी जीवाची बाजी लावून केलेल्या या अनन्यसाधारण धाडसी ‘रेस्क्यू’ आॅपरेशन द्वारे आपली सामाजिक बांधीलकी सर्वांनाच दाखवून दिली. महाडमधील दि अण्णासाहेब सावंत को. आॅप अर्बन बँक महाड या अर्बन सहकारी बँकेने ३७ ट्रेकर्सचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून उतरवून सामाजिक बांधीलकीच्या उत्तरदायित्वाचा अनोखा वस्तुपाठ राज्यातील सहकारी बँकांसमोर ठेवला.
सर्वसाधारण सभेत निर्णय
१शुक्रवारी झालेल्या बँकेच्या ८७ व्या सर्वसाधारण सभेत आम्ही हा निर्णय घेतला आहे. सह्याद्री मित्रचे १६ आणि सिस्केपचे २१ अशा ३७ सदस्यांचा प्रत्येकी पाच लाखांचा हा विमा बँकेने उतरवला असून, त्याचा ६१४ रुपये प्रीमियम बँकेच्या वतीने भरण्यात येणार असल्याचे बँकेच्या अध्यक्षा शोभाताई सावंत यांनी ‘सांगितले. आंबेनळी घाटात झालेल्या अपघातानंतर त्या ठिकाणी सह्याद्री मित्र आणि सिस्केप सदस्यांनी केलेले अवघड काम तेही आपला जीव धोक्यात टाकून, त्याची दखल आम्ही घेत या सर्वांचा विमा उतरविण्याचा निर्णय केवळ सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून घेतला असल्याचे सांगितले.
५० ट्रेकर्सची टीम प्रत्येक जिल्ह्यात होऊ शकेल
२दि अण्णासाहेब सावंत को. आॅप अर्बन बँक महाड या बँकेने आंबेनळी घाट दुर्घटनेच्या वेळी जीवाची बाजी लावून ट्रेकर्सनी केलेले आपत्ती निवारणाचे काम हे अनन्यसाधारण असेच आहे. त्याचबरोबर महाड मधील या ३७ ट्रेकर्सना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरवून त्यांना विमा संरक्षण मिळवून देण्याच्या सामाजिक बांधीलकीतून केलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महाड अर्बन बँकेच्या या उपक्रमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका, अर्बन बँका वा मोठ्या पतसंस्था यांनी हा उपक्रम अमलात आणला, तर आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती निवारणाच्या कार्यात सहयोग देणारी शास्त्रशुद्ध प्रशिक्षित अशी ५० ट्रेकर्सची टीम प्रत्येक जिल्ह्यात तयार होऊ शकेल, असा विश्वास डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
आपत्कालीन परिस्थितीत धावून
येणारा ‘यूथ फोर्स’ निर्माण होऊ शकतो
महाड अर्बन बँकेने समाजोपयोगी काम करणाºया धाडसी ट्रेकर्सचा विमा उतरवण्याच्या सामाजिक बांधीलकीतून केलेला उपक्रम राज्यातील पहिलाच उपक्रम असून, युवकांमधील गिर्यारोहण आणि ट्रेकिंगचे कौशल्य सामाजिक समस्या आणि आपत्ती निवारणाकरिता उपयोगात आणण्याच्या मानसिकतेते युवा वर्गात यामुळे निश्चित वाढ होऊन, त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल, असा विश्वास गिर्यारोहण व निसर्ग भ्रमण उपक्रम आयोजनातील अग्रगण्य संस्था असलेल्या यूथ हॉस्टेल असोसिएशन आॅफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा नामांकित गिर्यारोहक रमेश किणी यांनी व्यक्त केला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत यापूर्वीही गिर्यारोहणातील कौशल्यांचा वापर करून मानवीहानी कमी करून मालमत्तांचे संरक्षण करण्यात तरुणाई अनेकदा यशस्वी झाली आहे. शासनस्तरावर गिर्यारोहण या साहसी खेळास राजमान्यता प्राप्त होऊन, या साहसी खेळास प्राधान्य दिले तर आपत्कालीन परिस्थितीत धावून येणारी ‘यूथ फोर्स’ यातून निर्माण करता येऊ शकेल. शासकीयस्तरावर पोलीस दलातील नव्याने भरती झालेल्या पोलिसांना गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस दलात आपत्ती निवारणाकरिता एक तरुण पोलिसांची तुकडी तयार करण्याचा यूथ हॉस्टेल असोसिएशनचा मनोदय असून, त्याकरिता आम्ही प्रयत्नशील असल्याचे किणी यांनी अखेरीस सांगितले.
वैद्यकीय प्रशिक्षण देण्याचा मानस
३सामाजिक समस्या विशेषत: आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खादा लावून काम करण्यासाठी समाजातील अनेक घटक नेहमीच स्वेच्छेने पुढे येत असतात. अशात महाडमधील या ३७ ट्रेकर्सना विमा संरक्षण देऊन महाड अर्बन बँकेने आपली सामाजिक बांधीलकी वेगळ्या प्रकारे निभावली आहे. जिल्ह्यातील ट्रेकर्स आणि युवकांमधून जिल्ह्याकरिता आपत्ती निवारणाकरिता एक नवी फौज या माध्यमातून निर्माण होऊ शकते. अशा ट्रेकर्सना आपत्ती काळात प्रथमोपचार आणि तातडीचे वैद्यकीय उपचार या बाबत आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही सामाजिक बांधीलकी म्हणून निश्चित करू, असा मानस रायगड मेडिकल असोसिएशनचे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी व्यक्त केला.