त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात, किरवली येथील डोलकाठीचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:37 AM2019-11-13T00:37:42+5:302019-11-13T00:37:46+5:30

किरवली, हालीवली, वांजळे आदी गावांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा यात्रास्वरूपात साजरी करण्यात येते.

Tripurari Purnima Excitement, Attractions of Dolkathi in Kirwali | त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात, किरवली येथील डोलकाठीचे आकर्षण

त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात, किरवली येथील डोलकाठीचे आकर्षण

Next

कर्जत : तालुक्यातील किरवली, हालीवली, वांजळे आदी गावांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा यात्रास्वरूपात साजरी करण्यात येते. किरवली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा उत्साहात पार पडली. किरवली-देऊळवाडी येथे देवाची डोलकाठी नाचविली जाते. त्याचे आकर्षण भाविकांना असते, यंदासुद्धा तरुणांनी ही डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर, हातावर ठेवून नाचविली. नवसाला पावणाऱ्या या दैवताचे दर्शन कर्जत शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घेतले.
यंदा भैरवनाथ मंदिराचे बांधकाम सुरू असल्याने किरवली-देऊळवाडी येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या परिसरात नवसाला पावणाºया व परिसराचे रक्षण करणाºया श्री भैरवनाथाची यात्रा पहाटे ४.३० वाजता काकड आरतीने सुरू झाली. त्यानंतर परिसरातील श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळाचे संगीत भजन झाले. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास डोलकाठीची पूजा करण्यात आली. परंपरेनुसार या डोलकाठीच्या टोकाला ढाक येथील चढण्या-उतरण्यास अत्यंत कठीण असलेल्या भैरी मंदिरातून गरुडध्वज आणला आणि काठीच्या तुºयावर बांधला. या डोलकाठीची पूजा ट्रस्टचे अध्यक्ष किसन जैतू बडेकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर डोलकाठीच्या मोरपिसाºयाने शिवमंदिरातील शिवपिंडीला आरतीच्या वेळी वारा घालून, ही ३० फूट उंचीची काठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर व हातावर ठेवून बिपीन बडेकर, शत्रुघ्न बडेकर, विश्वनाथ बडेकर, पप्पू बडेकर, विकास बडेकर, चिराग बडेकर, सुरेश बडेकर आदीनी नाचवत नेली. ही वजनी डोलकाठी नाचविण्यासाठी ताकदीची गरज नसते, तर अनुभवाची आवश्यकता असते.
डोलकाठी नाचवत नाचवत देऊळवाडी, बोरवाडी, किरवली येथे नेण्यात आली. त्या पाठोपाठ श्री भैरवनाथाची पालखी ओंकार भजन मंडळ आसरोटी-खालापूर यांच्या भजनी संगीतासह मिरवणुकीने नेण्यात आली. प्रत्येक घरी पालखीत असलेल्या श्री भैरवनाथाच्या मूर्तीची मनोभावे आरती व पूजा करण्यात आली. दिवेलागणीच्या सुमारास सुवासिनींनी उकडलेल्या पिठाचे दिवे सुपातून उडविले. पूर्वी हे दिवे घेण्यासाठी एकच झुंबड असे. ते खाण्यात वेगळीच मजा येत होती; परंतु कालानुरूप त्यात बदल झाला असून हल्ली उडविलेले दिवे उचलण्यासाठी मुले येत नाहीत.
>रेवदंडा : त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने चौल-रेवदंडा परिसरातील विविध मंदिरात साजरी करण्यात आली. रेवदंडा गावचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात काकडा तयार करून हा काकडा पेटवून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली गेली. अनेक मंदिरात पणत्या लावल्याने मंदिरे उजळून निघाली होती. चौलमधील पुरातन मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा साजरी झाली. श्री मुख्य गणेशमंदिर, राममंदिर, कुंडेश्वर मंदिर तर सर्वात भव्य कार्यक्रमात श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर परिसर उजळून निघाला होता. दिव्यांची रोषणाई, रांगोळ्यांचा थाट पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Tripurari Purnima Excitement, Attractions of Dolkathi in Kirwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.