युतीचे लोकसभा उमेदवार अनंत गीते अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:36 PM2019-04-10T23:36:34+5:302019-04-10T23:36:47+5:30
रायगड मतदारसंघ : आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असल्याने त्यांच्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारी नोटीस रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या वतीने अॅड. सचिन जोशी यांनी बुधवारी रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिली आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करताना शिवसेना पक्षाचे उमेदवार अनंत गंगाराम गीते यांनी त्यांच्या प्रचाराकरिता ‘सिंहावलोकन’या नावाने एक पुस्तिका काढलेली आहे. या पुस्तिकेचे शीर्षक ‘अनंत गीते, मंत्री, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम, भारत सरकार, १६ व्या लोकसभा कार्यकाळात ३२-रायगड लोकसभा मतदारसंघात खासदार निधी व विविध माध्यमातून केलेली विकासकामे’ असे आहे. ही पुस्तिका रंगीत स्वरूपाची असून त्यामध्ये ३६ पाने, एक मुखपृष्ठ व एक मलपृष्ठ आहे. मात्र, या पुस्तिकेच्या पानांना क्रमांक दिलेले नाहीत. तसेच या पुस्तिकेवर प्रकाशकाचे व वितरकाचे नाव नाही. या पुस्तिकेच्या किती प्रती काढल्या याचा तपशीलदेखील नाही. या पुस्तिकेचा सर्रास वापर प्रचाराच्या दरम्यान अनंत गंगाराम गीते करत आहेत.
आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे कोणत्याही प्रकारे मुद्रित कागदपत्रांच्या प्रचाराकरिता वापर करायचा असल्यास त्याची प्रथमत: सक्षम अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे, त्यावर प्रकाशकाचे नाव तसेच मुद्रकाचे नाव, प्रती, रक्कम हा सर्व तपशिल लिहिणे आवश्यक आहे. मात्र, या प्रकारे कोणताही तपशील या पुस्तकेवर नाही, त्यामुळे या प्रकारे तपशील नसलेल्या पुस्तिकेचे वाटप हा आचारसंहिता भंगबाबतचा गुन्हा होत आहे. तरी शिवसेना पक्षाचे उमेदवार अनंत गंगाराम गीते यांच्याविरोधात त्वरित आचारसंहिता भंगबाबतचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या
सी-व्हिजिल अॅपवरही तक्रार
च्‘सिंहावलोकन’ या पुस्तिकेची प्रतदेखील नोटीससोबत सादर करण्यात आली आहे. दरम्यान, अनंत गंगाराम गीते यांच्या या ‘सिंहावलोकन’ पुस्तिकेबाबत आम्ही निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिल या अॅपवरही तक्रार दाखल करीत असल्याची माहिती अॅड. जोशी यांनी दिली आहे.
च्रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करताना शिवसेना पक्षाचे उमेदवार अनंत गंगाराम गीते हे आचारसंहितेचा वारंवार भंग करत आहेत. यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात व्यक्तिश: खोटे व खोडसाळ आरोप करत आहेत, या आशयाची एक तक्रार यापूर्वीच दाखल केली असल्याचे याच नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पहिल्या तक्रारीबाबत
कारवाईचे आदेश
शिवसेना उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी आलेल्या तक्रारीबाबत खातरजमा करून कारवाई करण्याकरिता संबंधित उप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी दाखल तक्रारीबाबत खातरजमा करून माहिती देण्यात येईल.
- भरत शितोळे, अप्पर जिल्हाधिकारी रायगड तथा प्रमुख, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती.