भात पेरण्या अडचणीत
By admin | Published: June 18, 2017 02:11 AM2017-06-18T02:11:42+5:302017-06-18T02:11:42+5:30
: जिल्ह्यात ८ जून रोजी दाखल झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, भात पेरणीला सुरुवात करण्यात आली होती. भाताची रोपेही उगवली. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून
जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : जिल्ह्यात ८ जून रोजी दाखल झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, भात पेरणीला सुरुवात करण्यात आली होती. भाताची रोपेही उगवली. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. मृग नक्षत्रावर आलेल्या पावसामुळे नदी-नाले, तळी, विहिरी आणि पांटबंधारे तलाव भरतील आणि जिल्ह्यातील उन्हाळी पाणीटंचाई संपुष्टात येईल, ही आशादेखील फोल ठरली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९१ गावे आणि ३०७ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असून, तीन टँकर्सच्या माध्यमातून येथे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील भात लागवडीखालील एकूण १ लाख २३ हजार हेक्टर खरिपातील क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या १० टक्के म्हणजे
सुमारे १० हजार हेक्टरवर जिल्ह्यात भाताच्या पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. जिल्ह्यात ८० टक्के पेरण्या पूर्ण होऊन भात रोपांची उगवणदेखील चांगली झाली; परंतु आता पावसाने दडी मारल्याने, केवळ पावसाच्या पाण्यावर अबलंबून असणाऱ्या भात पेरण्या तप्त उन्हाने करपून जाऊ लागल्या आहेत.
२१ जून ते ५ जुलै दमदार पावसाचे भाकीत
२१ जून २०१७ रोजी आर्द्रा नक्षत्रावर येणारा पाऊस हा दमदार आणि शेतीला पूरक असाच राहणार असून, तो ५ जुलैपर्यंत चांगल्या प्रकारे पडेल, असे पर्जन्य भाकीत पेण येथील सूक्ष्म आयुर्वेदतज्ज्ञ, ज्येष्ठ ज्योतिषी तथा सूर्य-चंद्र-नक्षत्र अभ्यासक डॉ. संजय टिळक यांनी व्यक्त केले आहे.
पहिल्या टप्प्यातील पाऊस जमिनीतच मुरला
गतवर्षी १६ जून २०१७पर्यंत एकूण ८४२.१० मि.मी. (सरासरी ५२.६३मि.मी.) पाऊस झाला होता. तोच पाऊस यंदा १६ जून २०१७ रोजीपर्यंत ४०३७ मि.मी.(सरासरी २५२मि.मी.) म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत पाचपट होऊनदेखील पाण्याचे दुर्भीक्ष संपू शकले नाही. याचे कारण यंदाच्या उन्हाळ््यात वाढलेले विक्रमी तापमान. भिरा येथे ४६ डी.से. अधिकतम तापमानाची नोंद झाली होती. या विक्रमी तापमानामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे यंदा पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस पूर्णपणे जमिनीत जिरल्याने जलदुर्भीक्ष कमी होऊ शकले नाही, असा निष्कर्ष पोलादपूर येथील एस. एम. कॉलेजचे प्राचार्य व भूगोलतज्ज्ञ डॉ. समीर बुटाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.
भात पेरण्या वाचवायच्या कशा?
येत्या २१ जून रोजी ‘म्हैस’ या आपल्या वाहनावरून येणाऱ्या आर्द्रा नक्षत्रावरील पाऊस चांगल्या प्रकारे होणार, असा आशावाद शेतकऱ्यांना आहे; परंतु तोपर्यंत भात पेरण्या वाचवायच्या कशा? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
तप्त कातळावर पाऊस पडल्याने भूस्खलनाचा धोका
विक्रमी तापमानामुळे सह्याद्रीमधील डोंगरकडे व
खडक अधिक प्रमाणात तप्त झाले. त्यावर पाऊस पडला तर त्या कातळांच्या वरील डोंगरावरून वाहात आलेले पावसाचे पाणी या कातळावर आले आणि हे कातळ काही ठिकाणी फुटून भूस्खलन (लॅण्डस्लाइड) झाल्याचेही दिसून येत असल्याचा आणखी एक निष्कर्ष डॉ. बुटाला यांनी स्पष्ट केला आहे.
सामूहिक रोपवाटपाचा शेतकऱ्यांना सल्ला
भाताच्या पेरण्या करपून गेल्या, तर पुन्हा भात पेरण्या कराव्या लागून पहिले बियाणे फुकट जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी हळव्या निम गरव्या भात जातींचा वापर करावा. ज्यांच्याकडे विहिरी-ओढ्यांचे पाणी उपलब्ध आहे. त्यांनी रोपवाटप करावेत. शक्य तेथे शेतकऱ्यांनी सामूहिक रोपवाटप करावे. विहिरी, नदी-नाले यांमधील पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करावे, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.