नागरी समस्यांमुळे कर्जतकर त्रस्त; मनसेची मुख्याधिकारी, नगराध्यक्षांबरोबर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:03 PM2019-07-21T23:03:21+5:302019-07-21T23:03:41+5:30

आठ दिवसांत समस्या सोडविण्याची मागणी

Troubled by civilian problems; | नागरी समस्यांमुळे कर्जतकर त्रस्त; मनसेची मुख्याधिकारी, नगराध्यक्षांबरोबर चर्चा

नागरी समस्यांमुळे कर्जतकर त्रस्त; मनसेची मुख्याधिकारी, नगराध्यक्षांबरोबर चर्चा

googlenewsNext

कर्जत : शहरात नळपाणी योजनेसह अनेक नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची भेट घेतली आणि आठ दिवसांत नागरी समस्या आणि पाणीपुरवठा योजनेतील तक्रारींचे निवारण करण्याबाबत निवेदन दिले.

कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला शनिवारी चर्चा करण्यासाठी वेळ दिली होती, त्यानुसार मनसेचे तालुका अध्यक्ष अंकुश शेळके, मनसेचे कर्जत शहराध्यक्ष समीर चव्हाण, सरचिटणीस प्रसन्न बनसोडे यांनी अन्य कार्यकर्त्यांसह सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची भेट घेतली. मनसेच्या वतीने कचेरी येथील पाण्याच्या टाकीला सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली. पाण्याच्या जलकुंभाचे उघडे असलेले झाकण त्वरित लावावे. तसेच आकुर्ले, भिसेगाव, गुंडगे येथील जलकुंभ येथे होणारी पाणीगळती दूर करणे आणि तडे गेलेल्या जलकुंभांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. तसेच वीजप्रवाह खंडित झाल्यानंतर पाणीपुरवठा बंद होतो. त्यावर मात करण्यासाठी जनरेटरची सोय करणे आदी मागण्या करण्यात आल्या.

शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असून कचरा गाड्या या गल्लीबोळात जात नसल्याने शहराच्या विविध आठ भागातील कचऱ्याच्या ढिगाचे फोटो शनिवारी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना मनसेच्या शिष्टमंडळाने दाखवले आणि या सर्व नागरी समस्या आठ दिवसांत सोडविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी मनसेचे शहराध्यक्ष समीर चव्हाण यांनी दिला. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी, नळपाणी योजना ही कर्जत शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा योजना बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत याबाबतच्या उपाययोजनांची माहिती दिली. आकुर्ले येथील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती पुढील तीन दिवसांत होईल आणि त्या काळात नागरिकांना पाणीदेखील दिले जाईल अशी माहिती या वेळी दिली.

कचेरी येथील मुख्य जलकुंभ परिसरात गेट बसविण्यात आले असून, संरक्षण भिंत, कुंपण आणि नंतर सीसीटीव्ही कॅमेरे अशी कामे केली जात आहेत. मुख्याधिकारी कोकरे यांनी यापुढे टोइंग व्हॅन ही पोलीस कर्मचारी असल्याशिवाय शहरात फिरणार नाही, असे स्पष्ट केले.

Web Title: Troubled by civilian problems;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.