रोहा : रोहा-नागोठणे राज्य मार्गावरील डॉ. सी.डी. देशमुख महविद्यालयाजवळ शनिवारी पहाटे ५ वाजता लोखंडाचा कच्चा माल वाहून नेणारा ट्रक (एमएच४६ एच ०१७३) पलटी आहे. या मार्गावरील वळण धोकादायक आहे. या वळणावर लोखंडाचा कच्चा माल साळाव येथून जेएनपीटीमध्ये घेऊन जात होता. धोकादायक वळणावर ट्रकचालकाने दुसऱ्या अवजड वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यालगत पलटी झाला. अपघातात जीवितहानी झाली नसली तरी साइडपट्टीवरील माती ओली असल्याने ट्रक रस्त्यालगत सहा ते सात फूट खाली शेतात पलटी झाला.
रोहा-नागोठणे राज्य मार्गावर साइडपट्टीचा अभाव आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रारही करण्यात आली होती. मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने मार्गावर अपघात घडत आहेत. मार्गावर रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी या रस्त्याच्या बाजूला अपघाताच्या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.