"राज्य सरकारवर केवळ टीका करण्यापेक्षा एनडीआरएफचे निकष बदलण्याचे प्रयत्न करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 02:41 AM2020-07-04T02:41:59+5:302020-07-04T02:42:35+5:30

सुनील तटकरे यांच्या कानपिचक्या : निसर्ग वादळातील मदत वाटपाबाबत तपशील जाहीर

"Try to change NDRF criteria rather than just criticize the state government" | "राज्य सरकारवर केवळ टीका करण्यापेक्षा एनडीआरएफचे निकष बदलण्याचे प्रयत्न करा"

"राज्य सरकारवर केवळ टीका करण्यापेक्षा एनडीआरएफचे निकष बदलण्याचे प्रयत्न करा"

Next

रायगड : राज्य सरकारवर टीका करण्यापेक्षा एनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी प्रयत्न करा, अशा कानपिचक्या खासदार सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना दिल्या. निसर्ग वादळातील मदत वाटपाबाबतच्या पत्रकार परिषदेत ते अलिबाग येथे बोलत होते.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मदत वाटपात दुजाभाव होत असल्याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्याला खासदार तटकरे यांनी उत्तर दिले. पश्चिम बंगाल आणि ओडीसा राज्यातील वादळाबाबत केंद्र सरकारने एनडीआरएफच्या निकषात बदल केले. त्यामुळे त्या राज्यांना आता केंद्राचा निधी मिळण्यातील अडसर दूर झाला आहे. मात्र कोकणासाठी केंद्र सरकारने एनडीआरएफच्या निकषात बदल करावेत अशी सर्वप्रथम मागणी आम्ही केली, असे खासदार तटकरे यांनी स्पष्ट केले.

कोकणात मदत वाटपाबाबत राज्य सरकारने योग्य ते निर्णय घेतले आहेत. मात्र नुसती टीका करण्यापेक्षा फडणवीस आणि दरेकर यांनी कोकणासाठी एनडीआरएफच्या निकषात बदल करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे खडे बोल तटकरे यांनी सुनावले. एका दिवासात दौरे करुन कोकणी माणसाच्या मनातील वादळाची व्यापकता कळणार नाही. त्यासाठी शेताच्या बांधापासून ते मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागते असेही तटकरे यांनी सुनावले. नारळ आणि सुपारीसाठी वाढीव मदत देण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी मान्य केले आहे.

पर्यटन निवारा चालकांचेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकसान झाले आहे. काहींनी कर्ज काढून व्यवसाय सुरु केले आहेत. त्यामुळे पर्यटन आणि उर्जा विभाकडून माहिती मागवून त्यांना काही सवलत देता येईल का? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: "Try to change NDRF criteria rather than just criticize the state government"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.