मधुकर ठाकूर, उरण: पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गावाच्या विकासाचे ध्येय ठेवून सर्वांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध होईल असे प्रयत्न करा असे आवाहन उरणपोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी चिरनेरच्या कार्यक्रमातून केले. उरण तालुक्यातील जासई,दिघोडे आणि चिरनेर या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणक येत्या नोव्हेंबरला होणार आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते.
ग्रामपंचायतीची निवडणूक निवडणूक आयोगाचे नियम पाळून आणि निवडणूक दरम्यान व त्यानंतरही कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर काळजी घ्या असे आवाहन करतानाच यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आवाहन उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी केले आहे.गावाच्या विकासाकरिता गाव पातळीवरील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून गावाच्या विकासाकरिता गावाची एकजूट करा. ग्रामपंचायतींची निवडणूक ही बिनविरोध करा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत भोईर, शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उद्योगपती राजेंद्र खारपाटील, पोलीस पाटील संजय पाटील, माजी सभापती भास्कर मोकल, तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, शेकापचे सुरेश पाटील, माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, माजी उपसरपंच गोपीनाथ गोंधळी, ग्रामविकास अधिकारी महेश पवार,माजी उपसरपंच समाधान ठाकूर, धनेश ठाकूर गजानन वशेणीकर, राजेंद्र भगत, किरण कुंभार, चंद्रकांत गोंधळी, जयेश खारपाटील तसेच अन्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.