लोकमत न्यूज नेटवर्करोहा : नशाबाजीतून दशा झालेल्या तरु णाईला दिशा देण्यासाठी, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार रोहा पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक विलास रामुगडे यांनी, रोहा शहर व ग्रामीण भागात व्यसनमुक्तीचे संदेश देणारे फलक लावून, समाजमनात आणि विशेष करून तरुणवर्गात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाबद्दल समाजातून समाधान व्यक्त होत आहे. देशाचे भवितव्य तरुण पिढीवर अवलंबून आहे. सध्याची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. नशेबाजीतून समाज व समाजातील तरुण पिढी बरबाद होत आहे. परिणामी, तरुण पिढी, सदृढ, सक्षम, सशक्त, निर्व्यसनी व्हावी, याकरिता रायगड जिल्ह्यात नव्याने पदभार स्वीकारणारे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात नशाबंदीतून समाजप्रबोधन याकरिता जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. रोहे तालुक्यात व्यसनमुक्तीचे संदेश देणारे बॅनर्स लावून तरुणांमध्ये जनजागृतीचा नवीन पायंडा पाडल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
नशाबाज तरुणाईला दिशा देण्याचा प्रयत्न
By admin | Published: June 30, 2017 2:57 AM