महाड - तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, महाडचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र युवासेनेचे दक्षिण रायगड अधिकारी विकास गोगावले यांच्यासह सुमारे दीडशे शिवसैनिकांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.१५ जानेवारी रोजी सोमनाथ ओझर्डे यांनी फेसबुकवर बातमी शेअर केल्याने शिवसैनिक संतप्त झाले होते. या प्रकरणात चौकशी करून पोलिसांनी ओझर्डे यांना क्लीन चिट दिली. मात्र, त्यानंतर शिवसैनिकांनी ओझर्डे यांच्या निषेधाचे बॅनर लावले. सरपंच या नात्याने परवानगी घेऊन हे बॅनर लावलेत का, अशी विचारणा त्यांनी केली असता, शिवसैनिकांचा जमाव तेथे जमला. त्यात आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेही होते. आपल्यावर हल्ला होतोय हे लक्षात येताच, ओझर्डे तेथून गाडीतून जात असता विकास गोगावले, शिवकुमार गुरव यांच्यासह २५ ते ३० शिवसैनिकांनी गाड्यांमधून त्यांचा पाठलाग करत ओझर्डे यांच्या दिशेने रिव्हॉल्व्हरमधून फायरिंगही केली. या प्रकरणी ओझर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विकास गोगावले, शिवकुमार गुरव, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक यांच्यासह शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
महाडमध्ये सरपंचाला ठार मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 6:42 AM