अलिबाग : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे येत्या १५ जून रोजी किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता दरवर्षीप्रमाणे सोलापूर येथील रायगड प्रतिष्ठानचे शंभरहून अधिक मावळे येत असतात. तुळजाभवानी ज्योत घेऊन येणारे मावळे शुक्रवार, १४ जून रोजी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पोहोचणार असल्याची माहिती तुळजाभवानी ज्योतीचे प्रमुख शिवाजी भोसले यांनी दिली आहे.
शिवराज्याभिषेक समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रायगडावर होणाºया ३४६ व्या शिवराज्याभिषेक दिनासाठी महाराष्ट्रातून हजारो शिवप्रेमी मंडळे येत असतात. दरवर्षीप्रमाणे सोलापूर येथील रायगड प्रतिष्ठानचे शिवप्रेमी यंदाही किल्ले रायगडावर या सोहळ्यासाठी येत आहेत. ११ जून रोजी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन, तिथे मान्यवरांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून सोलापूर येथून हे मावळे रायगडकरिता रवाना झाले. १४ जून रोजी महाड शहरात शिवाजी चौक येथे या ज्योतीचे स्वागत झाल्यानंतर हे सर्व शिवभक्त किल्ले रायगडाच्या दिशेने वाजत-गाजत निघणार आहेत. पाचाड येथे वस्ती केल्यानंतर १५ जून रोजी पहाटे किल्ले रायगडावर होणाºया शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होतील. नैसर्गिक परिस्थितीचा सामना करीत हजारो मावळे किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी येतात, ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे होणाºया शिवराज्याभिषेक सोहळ्यात रायगडचे धारकरी म्हणूनच अशी प्रतिक्रिया सोलापूरचे शिवाजी भोसले यांनी दिली आहे.