- संजय गायकवाडकर्जत - कर्जत नगरपरिषद हद्दीतील नानामास्तरनगर, मुद्रे येथील एक आठ वर्षांची मुलगी मैत्रिणीकडे खेळायला जाते, असे सांगून गेली ती परत घरी आलीच नाही. याबाबत तिच्या आईने कर्जत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. कर्जत पोलिसांनी तिची शोध मोहीम सुरू केली आहे आणि चार दिवसांत मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.मूळची ओरिसामध्ये राहणारी कांती राणा ही आपल्या दोन मुलांना घेऊन मुद्रे गावात राहते, ती बिगारी काम करते. तिची आठ वर्षांची मुलगी तुलसी ही मैत्रिणीकडे खेळाला जाते, असे सांगून, ४ मार्च रोजी घराबाहेर गेली होती. मात्र, संध्याकाळी झाली तरी घरी परतली नाही. म्हणून तिची आई कांती हिने ५ मार्च रोजी कर्जत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे यांनी तपास सुरू केला. बिट मार्शल यांना मुलीची माहिती व फोटो देण्यात आले. पुणे, मुंबई, नवी मुंबई येथील मिसिंग ब्युरोला कळविण्यात आले. सर्व बाल सुधारगृहात या बाबतची माहिती देण्यात आली. शहरातील चौकाचौकांत हरवलेल्या मुलीचे फोटो लावण्यात आले.अखेर रसायनी पोलीसठाण्यातून तुलसी सापडली असून, त्या मुलीला खांदा वसाहतीमधील पंचग्राम संस्थेमध्ये ठेवले आहे, अशी माहिती ८ मार्च रोजी कर्जत पोलिसांना देण्यात आली. शुक्रवार, ९ मार्च रोजी कांता राणा हिला बरोबर घेऊन महिला होमगार्ड जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक गावडे त्या ठिकाणी पोहोचले आणि मायलेकीची भेट झाली. शनिवारी रात्री तुलसी व तिची आई कांता यांना घेऊन पोलीस उपनिरीक्षक गावडे पोलीसठाण्यात आले. चार दिवसांच्या तपासानंतर हरवलेल्या तुलसीचा शोध लागला होता. तपासात मुलगी खेळत खेळत मैत्रिणीबरोबर मुद्रे येथून चार फाटा येथे गेली, त्यांनतर ती मुलगी रसायनीपर्यंत कशी पोहोचली याचा तपास पोलीस करत आहेत. मुलगी लहान असल्याने तिला जास्त काही सांगता येत नाही. मात्र, तपासात मुलगी सुखरूप असल्याचे समोर आले आहे. \
चार दिवसांनी लागला हरवलेल्या तुलसीचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 6:38 AM