मानव विकास कार्यक्रम अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:45 AM2018-05-04T01:45:43+5:302018-05-04T01:45:43+5:30
मानव विकास कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील सुधागड-पाली या तालुक्याची निवड करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये गरोदर माता आणि लहान मुलांच्या आरोग्याची
आविष्कार देसाई
अलिबाग : मानव विकास कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील सुधागड-पाली या तालुक्याची निवड करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये गरोदर माता आणि लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या शिबिरामध्ये सरकारी तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने चांगलीच अडचण निर्माण होत आहे. वेळ निभावून नेण्यासाठी लगतच्या तालुक्यातील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्याची वेळ आयोजकांवर येते.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे मानव विकास कार्यक्रमातून खरोखरच सुधागड तालुक्यातील मानवाचा विकास साधला जाणार का, हा मोठा प्रश्न आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी आता आरोग्य प्रशासन रायगड मेडिकल असोसिएशनची मदत घेणार आहे. याबाबत असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुढील शिबिरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील, असे मानण्यास काहीच हरकत नाही.
मानवाच्या बळकटीकरणासाठी मानव विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड-पाली तालुक्याची निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील पाली आणि जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील गरोदर मातांसह लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबिर पार पडली आहेत.
२०१६-१७ आणि २०१७-१८ या कालावधीत मानव विकास कार्यक्रमासाठी ४९ लाख २८ हजार रुपयांचे अनुदान सरकारने देऊ केले होते. एकूण ६१ शिबिरांसाठी १० लाख ८४ हजार ५६ रुपये खर्च करण्यात आला आहे. एक हजार ८३५ गरोदर मांताच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. ७५६ गरोदर मातांना बुडीत मजुरीसाठी २६ लाख ७६ हजार रुपये देण्यात आले आहेत. शिबिरामध्ये एक हजार ४७७ बालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सॅम/मॅम श्रेणीतील १४८ बालके आढळली.
यातील गंभीर बाब म्हणजे ज्या गरोदर माता, स्तनदा माता यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी पाली आणि जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नाहीत. त्याचप्रमाणे लहान मुलांच्याही तज्ज्ञ डॉक्टरांचीही वानवा आहे.
मानव विकास कार्यक्रमामध्ये ज्या सुधागड-पाली तालुक्याची निवड केली आहे. त्या अंतर्गत येणाऱ्या पाली आणि जांभुळपाडा या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टरच नसणे हे गंभीर आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी तेथील आरोग्यप्रमुखांना लगतच्या तालुक्यातील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करावे लागते; परंतु हाताच्या बोटावर मोजणारेच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सरकारी सेवेत आहेत.
यातील दुसरी गंभीर बाब म्हणजे अलिबाग या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असणाºया जिल्हा सरकारी रुग्णालयात लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टरच नाहीत. त्यामुळे मानव विकास कार्यक्रमातून खरोखरच मानवाचा विकास साधला जाणार का? हा प्रश्न आहे.