पुलाचे दोनदा भूमिपूजन; तरी कामाला मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:37 PM2019-12-20T22:37:56+5:302019-12-20T22:38:02+5:30
निधीही मंजूर : आदिवासी वाडीतील ग्रामस्थांची गैरसोय
कांता हाबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यात नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी वाड्यांना जोडणारा पूल मार्च २०१८ मध्ये कोसळला आहे. त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी तब्बल दोन वेळा भूमिपूजन करण्यात आले, मात्र अद्याप पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्या पुलाच्या निर्मितीसाठी नेरळ विकास प्राधिकरणाने निधी दिला आहे, मात्र तरीही पुलाचे काम सुरू होऊ शकले नाही. दरम्यान, नेरळ विकास प्राधिकरणाविरुद्ध नागरिक एकवटले असून लोकप्रतिनिधींना घेराव घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मानवाधिकार संस्थेचे कार्यकर्ते गोरख शेप यांनी दिली आहे.
२४ मार्च २०१८ रोजी कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील नेरळ येथील ब्रिटिशकालीन धरणाखाली असलेला लहान पूल कोसळला होता. पूल कोसळल्यामुळे नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील सात आदिवासी वाड्या आणि मोहाचीवाडी भागातील रहिवाशांचा वर्दळीचा मार्ग बंद झाला होता. सर्व ग्रामस्थांना पूल तुटल्याने पोलीस ठाण्याच्या समोरून जावे लागत असल्याने तीन किमी वळसा घालून जावे लागत होते.
तत्कालीन आमदार तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पुलाची तत्काळ निर्मिती केली जाईल, असे जाहीरपणे सांगितले होते. पण पुलाच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ मे २०१९ मध्ये म्हणजे पूल कोसळल्यानंतर एक वर्षानंतर झाला. परंतु त्या वेळी फक्त कामाचा शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडले गेले आणि २०१८ प्रमाणे २०१९ च्या पावसाळ्यातही नागरिकांना पूल मिळाला नाही. त्यामुळे नेरळमधील नागरिकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.
रायगड जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष आस्वाद पाटील यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली. मात्र हा दौरादेखील केवळ स्टंट ठरला असून जिल्हा परिषदेच्या प्रभारी अध्यक्षांनी पाहणी दौरा करून महिना उलटला तरी पुलाच्या कामासाठी साधे खड्डेही खोदले नाहीत.
पुलाच्या निर्मितीसाठी पहिल्या दिवसापासून आवाज उठवणारी मानवाधिकार संघटना आता अधिक आक्रमक झाली आहे. पूल तुटल्यानंतर दीड वर्षाहून अधिक कालावधी लोटला तरी पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आता स्थानिक आदिवासी बांधव आणि मोहाचीवाडी ग्रामस्थ यांना एकत्र घेऊन मानवाधिकार संघटना लोकप्रतिनिधी यांना घेराव घालणार असल्याची माहिती गोरख शेप यांनी दिली आहे.
नेरळमधील पुलाच्या निर्मितीसाठी नेरळ विकास प्राधिकरणामधून ४० लाखांचा निधी दिला आहे. ठेकेदाराचीही नियुक्ती करण्यात आली असून पुलाच्या कामासाठी माती आणून टाकली आहे. लवकरच काम सुरू करण्याचे निर्देश ठेकेदाराला देण्यात येतील.
- प्रवीण आचरेकर, उपअभियंता, नेरळ विकास प्राधिकरण
जिल्हा परिषद निधी जाहीर करते, मग कामे का होत नाहीत, हे न समजण्यासारखे आहे. जनतेला नाहक त्रास देण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे.
- प्रवीण मोरगे,
उपाध्यक्ष, मानवाधिकार संघटना