दोन एकरांत १० टन कलिंगडे
By admin | Published: March 10, 2017 03:37 AM2017-03-10T03:37:22+5:302017-03-10T03:37:22+5:30
तालुक्यातील भातपीक शेतीतील नाव असलेले राजनाला कालवा परिसरातील शेतकरी विनय वेखंडे यांनी आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न कलिंगड शेतीतून घडविला आहे.
- विजय मांडे, कर्जत
तालुक्यातील भातपीक शेतीतील नाव असलेले राजनाला कालवा परिसरातील शेतकरी विनय वेखंडे यांनी आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न कलिंगड शेतीतून घडविला आहे. त्यांनी आपल्या दोन एकर शेतीतून चक्क १० टन कलिंगडे पिकविली आणि तिप्पट नफा कमविला आहे.
कर्जतच्या पूर्व भागातील विकासाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या राजनाला कालव्याच्या पाण्याने अनेकांना घडविले आहे. भाताचे विक्र मी उत्पादन घेणारे शेकडो शेतकरी कर्जत तालुक्यात आहेत. त्यातील वदप येथील विनय वेखंडे हे एक मोठे नाव. वर्षानुवर्षे भाताचे पीक घेणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना राजनाला कालवा बंद झाला आणि वेगळा विचार करायला भाग पाडले. अनेक शेतकऱ्यांनी राजनाला कालव्याचे पाणी बंद असल्याने भाजीपाला, कडधान्य यांची म्हणजे कमी पाण्यावर होणारी शेती केली. वेखंडे यांनी आपल्या शेतीपैकी पाच एकर जमिनीवर मागील तीन वर्षे भाजीपाला शेती केली. त्यात नफा झाला, पण समाधानकारक शेती करता येत नसल्याने २०१६ च्या सुरु वातीला कलिंगडाचे पीक काही भागात घेण्याचा लहानसा प्रयत्न केला. मात्र यावर्षी आधुनिक पद्धतीने कलिंगडाचे पीक घेण्यासाठी आॅक्टोबर २०१६ मध्ये नियोजन केले. ९० दिवसांच्या कलिंगडाचे पीक घेण्यासाठी १५ डिसेंबर रोजी वेखंडे यांनी वाफ्यांवर रोपे लावून घेतली. दोन एकर शेतीसाठी ७० हजार खर्च आला आहे. दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल १० टन कलिंगडाचे उत्पादन वेखंडे यांनी मिळविले आहे.
कर्जतच्या बाजारात तर कधी पनवेलच्या बाजारात वेखंडे यांच्या गावठी कलिंगडांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. त्याचे कारण म्हणजे चार किलोपासून पुढे वजन असलेली कलिंगडे वेखंडे यांच्या शेतात लावली होती. मुख्य म्हणजे यावर्षीचा महाशिवरात्री महोत्सवात त्यांनी मोठ्या प्रमाणात कलिंगडाची विक्र ी केली असून झालेल्या खर्चाच्या तिप्पट नफा मिळविला आहे. वेखंडे यांच्या कलिंगडाचे १० टनाहून अधिक उत्पादनाची चर्चा असून असंख्य शेतकरी कलिंगडाचे पीक पाहण्यासाठी वदप गावातील शेताला भेट देत आहेत.
शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन केल्याने आणि आधुनिक पद्धत स्वीकारत असताना योग्य नियोजन केल्याने चांगले पीक आले. दोन एकरमध्ये १० टन कलिंगडाचे उत्पन्न आल्याने नफा झाला आहे.
-विनय वेखंडे, शेतकरी