दोन एकरी तलाव झाला गुंठ्यांचा, भराव करून अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 02:39 AM2019-06-10T02:39:58+5:302019-06-10T02:40:25+5:30
भराव करून अतिक्रमण : खैरणे गावातील प्रकार; महसूलसह वनविभागाकडून कारवाईस टाळाटाळ
पनवेल : पनवेल तालुक्यातील खैरणे गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या तलावावर अतिक्रमण करण्यात आले आहे. जागा हडप करण्यासाठी तलावात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करण्यात आला आहे. सुमारे दोन एकर जागेवर विस्तारलेला तलाव भरावामुळे आता अवघ्या काही गुंठे जागेत सीमित झाला आहे.
दोन वर्षांपासून खैरणे ग्रामपंचायत यासंदर्भात महसूल व वन विभागासोबत पत्रव्यवहार करत आहे. मात्र, कारवाईचे पत्र काढून तारीख, वेळ निश्चित करूनही कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीच्या हद्दीत जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे इंचइंच जमिनीची विक्री केली जात आहे. येथील तलावातही मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करण्यात आला असून ही जागा विकण्याचा काहींचा डाव आहे.
तालुक्यातील खैरणे गावात ग्रामपंचायतीने १९७० च्या दशकांत तलाव बांधला होता. पाणीटंचाईने त्रस्त खैरणे गावाला तलावाचा एकमेव आधार आहे. ग्रामस्थ दैनंदिन वापरासाठी तलावातील पाणी वापरतात. परिसरातील गुरेही याच पाण्यावर आपली तहान भागवतात.
तळोजा एमआयडीसीत असलेल्या तलावाभोवती अतिक्रमण करून तलाव बुजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सुरुवातीला तलावाभोवती घरे बांधण्यात आली. सुमारे दोन एकर जमिनीवर असलेला हा तलाव रोजगार हमी योजनेतून बांधण्यात आल्याची नोंद ग्रामपंचायत दफ्तरी आहे. गावातील नागरिकांनी या अतिक्रमणाला वेळोवेळी विरोध केला, मात्र सत्तेच्या पुढे ग्रामस्थांचे काही चालले नाही. तीन वर्षांपूर्वी या तलावात थेट मातीचा भराव करू जागा हडप करण्याच्या उद्देशाने अतिक्रमण करण्यात आले. गावच्या सरपंच सोनाली प्रमोद माळी यांनी तलावातील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. ही जमीन वनविभागाची असल्यामुळे वनविभागाकडे पाठपुरावा करण्यात आला.
आमदार बाळाराम पाटील यांनी विधानपरिषदेत हा विषय उपस्थित केल्यानंतर संबंधित तलावाची जमीन वनविभागाच्या मालकीची नसल्याचे उत्तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्यानंतर ग्रामपंचायतीने तहसील कार्यालयाशी पाठपुरावा सुरू केला. २०१८ मध्ये अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून पोलिसांना पत्र पाठवून बंदोबस्ताची मागणी केली. मात्र, कारवाई झालीच नाही. तलावाची जागा वनविभागाची नसल्याचे सिद्ध होऊन अतिक्रमणावर कारवाईची तारीख ठरविली जाते. मात्र, प्रत्यक्षात कारवाई होत नसल्यामुळे सरपंच सोनाली माळी यांनी कोकण आयुक्तांकडे या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर जागे झालेल्या प्रांत कार्यालयाने तहसील कार्यालयाला दिलेल्या आदेशानंतर तहसीलदार अमित सानप यांनी ६ जून रोजी अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तयारी केली. तळोजा पोलिसांकडून बंदोबस्त मागविण्यात आला. मात्र, कारवाईच्या ठिकाणी तहसीलदार अमित सानप उपस्थित नसल्याने कारवाई पुन्हा एकदा स्थगित केली.
सार्वजनिक मालकीच्या तलावातील अतिक्रमण काढण्यासाठी वेळ, तारीख निश्चित केली जाते. मात्र, कारवाई होत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. एकीकडे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन पाण्याचे स्रोत जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, पनवेल तालुक्यातील खैरणे गावात तलाव बुजवण्याचा चंगच बांधला आहे. शासनाचेही संबंधितांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे.
- प्रल्हाद म्हात्रे, सदस्य,
खैरणे ग्रामपंचायत
तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावली आहेत. त्या संदर्भात वनविभागाने निर्णय घेणे अपेक्षित आहे. या ठिकाणी कोणतेही अतिक्रमण होऊ देणार नाही. शिवाय वनविभागाच्या परवानगीशिवाय येथील झाडेही तोडता येणार नाहीत. या ठिकाणी अवैधरीत्या भराव करण्यात येत असल्यास पाहणी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- अमित सानप,
तहसीलदार, पनवेल