अडीच वर्षांच्या शर्विकाने केला कलावंतिणीचा सुळका सर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 05:19 AM2020-03-03T05:19:30+5:302020-03-03T05:19:38+5:30
कलावंतीणीचा सुळका प्रजासत्ताकदिनी अर्ध्या तासात चढून सर केला. शर्विकाची चढण्याची जिद्द पाहून इतर पर्यटकांनाही सुळका चढण्याची स्फूर्ती मिळाली.
निखिल म्हात्रे
अलिबाग : लोणारे गावातील अडीच वर्षाच्या चिमुरडीची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. शर्विका म्हात्रे असे तिचे नाव असून कर्जत माथेरानमधील किल्ले प्रबळगडचा अवघड असा कलावंतीणीचा सुळका प्रजासत्ताकदिनी अर्ध्या तासात चढून सर केला. शर्विकाची चढण्याची जिद्द पाहून इतर पर्यटकांनाही सुळका चढण्याची स्फूर्ती मिळाली. यापूर्वी शिर्विका हिने अकरा किल्ले सर केले आहेत.
कर्जत-माथेरान दरम्यान प्रबळगड किल्ला असून तो चढण्यासाठी साधारण तीन तासांचा अवधी लागतो. तेथून कलावंतीणीचा सुळका चढण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात. आजूबाजूला कशाचाही आधार नसलेल्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आणि आभाळाला भिडणारा सुळका सर करताना भल्याभल्यांची भंबेरी उडते. शार्विकाने या सुळक्यावर आरोहण करून गडावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावला. तसेच गडावर स्वच्छता आणि व्यसनमुक्तीचे फलक झळकावित समाजाला एक उत्तम असा संदेश दिला. शर्विकाने गड सर करताना शिवरायांवर अधारीत ओव्या, पोवाडे, भुपाळ्या म्हणत कलावंतीणीचा सुळका सर केला.
भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून तिने महाराष्ट्राचे नाव देशात सुवर्णाक्षरांनी कोरले असल्याने तिच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
>११ किल्ले सर
शर्विकाची प्रबळ इच्छाशक्ती असल्यामुळे तिने सागरगड, प्रतापगड, खांदेरी, कुलाबा, रायगड, कोर्लई, रेवदंडा, मुरु ड-जंजिरा,पद्मदुर्ग, उंदेरी, कलावंतीणीचा दुर्ग असे ११ किल्ले
व गड सर केले आहेत. शर्विकाच्या या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.