खोपोली : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या खोपोली नगरपालिकेला केंद्र शासनाने दोन पुरस्कारांची घोषणा केली. ६ मार्चला राष्ट्रपतींच्या उपस्थितीत केंद्रीय नगरविकास मंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या संबंधीचे पत्र मुख्याधिकारी संजय शिंदे यांंना मंगळवारी प्राप्त झाले.
छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी पुरस्काराची माहिती सांगताच सभागृहात बाके वाजवून उपस्थितांनी अभिनंदन केले.
मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी या अभियानात सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानताना, आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी वर्ग व संगणक कर्मचारी यांंना शाबासकी दिली. मागील सर्वेक्षणात आपण कमी पडलो; पण या वेळी सर्व जणांनी खूप मेहनत घेतली. लोकप्रतिनिधी, पत्रकार, नागरिक यांनी विशेष सहकार्य केले. या यशामागे सर्वांची मेहनत असल्याचे सांगून कोकणात खोपोली व रत्नागिरी पालिकेला हा पुरस्कार मिळाल्याची माहिती त्यांनी सांगितली. ६ मार्चला पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यासंबंधी तपशील समजेल, असेही त्यांनी सांगितले.
दोन पुरस्कारांपैकी स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महाराष्ट्रातील १३ महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये खोपोलीचा ७ वा क्रमांक लागतो. तसेच अन्य पुरस्कार गार्बेज फ्री सिटी हाही महाराष्ट्रात १२ महानगरपालिका व नगरपालिका या यादीत खोपोली ६ व्या क्रमांकावर असल्याची माहिती मुख्याधिकारी शिंदे यांनी दिली.