वादळामुळे धरमतरकडे निघालेल्या दोन बार्ज भरकटल्या: दोन्ही बार्ज उरणच्या किनाऱ्यावर: कर्मचारी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 10:49 PM2022-08-10T22:49:34+5:302022-08-10T22:50:14+5:30
Uran: मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेल्या परंतु वादळामुळे भरकटलेल्या दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनाऱ्यावर पोहोचल्या आहेत.
- मधुकर ठाकूर
उरण : मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेल्या परंतु वादळामुळे भरकटलेल्या दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनाऱ्यावर पोहोचल्या आहेत. या भरकटलेल्या दोन्ही बार्जची, कोस्ट गार्ड, नवीमुंबई सागरी सुरक्षा शाखेचे पोलिस आणि तहसिलदारांनी माहिती घेतल्यानंतर अनेक शंका कुशंका दूर झाल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
मुंबईकडून मंगळवारी ( ९ ) एसएन ऑल कंपनीचै ( ९ ) एमव्ही- श्रीकांत आणि अरब इंटरप्राईझेस कंपनीचे एमव्ही- जी-२ या दोन मालवाहू बार्ज रायगड जिल्ह्यातील धरमतर येथील इस्पात कंपनीकडे निघाल्या होत्या.मात्र वादळामुळे समुद्रात उसळणाऱ्या उंचच लाटांमुळे नांगर तोडून या दोन्ही बार्ज भरकटून उरण तालुक्यातील केगाव - माणकेश्वर मंदिराच्या किनाऱ्यावर येऊन ठेपल्या आहेत.एमव्ही- श्रीकांत ही रिकामी बार्ज केगाव - माणकेश्वर मंदिराजवळील तर एमव्ही- जी-२ अरब इंटरप्राईझेस ही दुसरी बार्ज सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या करंजा-एनएडी नेव्ही जेट्टीच्या खडकाळ किनाऱ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास लागल्या आहेत.
या दोन्ही मालवाहू बार्जची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोस्ट गार्डने हेलिकॉप्टरने पाहणी केली.तसेच नवीमुंबई सागरी सुरक्षा शाखेचे पोलिस अधिकारी पृथ्वीराज भामरे आणि तहसिलदारांच्या पथकाने पाहणी केली आहे.या दोन्ही बार्जवर पण प्रत्येकी पाच-सहा खलाशी आहेत. या दोन्ही बार्जच्या खलाशांकडे मदत हवी नको यासाठीही चौकशी करण्यात आली.मदतीची आवश्यकता नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. चौकशीअंती रेडॲलर्ट उठविण्यात आल्यानंतर दोन्ही बार्ज इच्छीत स्थळी धरमतरकडे रवाना होणार आहेत.तसेच कर्मचाऱ्यांनीही आपापल्या कुटुंबियांशी संपर्क साधून सुखरूप असल्याचे कळविले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.