मुरुडमध्ये फणसाड अभयारण्यात आढळले दोन बिबटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:36 PM2019-05-20T23:36:33+5:302019-05-20T23:36:39+5:30
या प्रगणनेसाठी निसर्गप्रेमी संघटनेतील सदस्यांची सुद्धा मदत घेण्यात आली होती.
- संजय करडे
मुरुड : बुद्धपौर्णिमेच्या मुहूर्तावर फणसाड अभयारण्यातील सर्व वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली. या प्रगणनेच्या वेळी दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने येथे बिबट्याचे अस्तित्व असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. फणसाड अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक बी.बी.बांगर व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्यातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
या प्रगणनेसाठी निसर्गप्रेमी संघटनेतील सदस्यांची सुद्धा मदत घेण्यात आली होती. १४ ट्रॅप कॅमेरे व लागणारे तज्ज्ञ व्यक्ती सुद्धा यासाठी नियुक्त करून ही प्रगणना पूर्ण करण्यात आली. जेथे पिण्याच्या पाण्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची मचाण बनवण्यात येऊन फणसाडच्या कर्मचारी वृंदांनी रात्रभर जागता पहारा देऊन ही मोजदाद पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. या अभयारण्यातील बिबटे गायब झाले आहेत अशी शंका येथील नागरिकांना होती, परंतु या प्रगणनेच्या वेळी दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने जंगलाच्या अतिदाट भागात त्यांचे वास्तव्य असल्याचे दिसून येते.
संख्या वाढण्याची शक्यता
च्या प्रगणनेबाबत अधिक माहिती देताना फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण म्हणाले की, या संपन्न झालेली वन्यजीव मोजदाद ही त्या दिवशी जेवढे वन्यजीव दिसले त्याप्रमाणे ही नोंद करण्यात आली आहे. याचा अर्थ कोणीही असा समजू नये या अभयारण्यात एवढेच प्राणी आहेत. यापेक्षा जास्त वन्यजीव येथे अस्तित्वात असून या जंगलात त्यांचे व्यवस्थित संगोपन होत आहे. प्रगणनेसाठी कर्मचारी वृंद व निसर्गप्रेमी संघटना यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
सांबर ७
भेकर १
रानडुक्कर ९
शेकरू ९
ससा १
रानगवे २
रानमांजर १
फ्रॉग माऊथ ३
साळींदर १
मुंगूस ३
माकडे ३३
वानर ३१
रानकोंबडे ११
मोर ६
गिधाड ०
ब्राहमी घार ३