दिघी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी शनिवारी सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथील तीन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये म्हसळा तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस संतोष पाटील यांची दोन मुले आणि ऐरोली येथील मित्राचा समावेश आहे. अवधूत संतोष पाटील (वय २६), मयुरेश संतोष पाटील (२३) आणि ऐरोली येथील मित्र हिमांशू पाटील (२१) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गोंडघर येथील अवधूत व मयुरेश चार मित्रांसह वेळास समुद्रकिनारी फिरायला गेले होते. समुद्रकिनारी क्रिकेट खेळताना बॉल समुद्रात गेल्याने ऐरोली येथील हिमांशू पाटील तो आणायला गेला.
मात्र तो बुडत असल्याचे दिसताना दोघे भाऊ त्याला वाचवायला गेले, पण ओहोटीची वेळ असल्याने तिघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने तोल जाऊन ते खोल पाण्यात ओढले गेले. या घटनेमुळे गोंडघर परिसरात खळबळ उडाली होती.
सहा महिन्यांपूर्वीच अवधूतचे झाले होते लग्न
अवधूत याने दोन दिवसांपूर्वीच नवीन कार घेतली होती. विशेष म्हणजे त्याचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.
समुद्रावर फिरायला न जाता घरी कारची पूजा करण्याचा आग्रह कुटुंबियांनी केला होता, मात्र तो मित्रांसह फिरायला गेला.
रुग्णालयात नातेवाइकांची, नागरिकांची गर्दी
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ धवल तवसाळकर, निलेश कदम, समुद्रकिनारी पोहचले. यांनी दिघी सागरी पोलिसांना घटनेबद्दल कळविले.
दिवेआगर येथील वॉटर स्पोर्ट बोटी व आदगाव येथील कोळी बांधवांनी बोटी घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत. या वेळी रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती.