एकाच रात्री दोन घरफोड्या
By admin | Published: August 12, 2015 12:22 AM2015-08-12T00:22:13+5:302015-08-12T00:22:13+5:30
रोहा तालुक्यासह शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांउला आहे. रोहा, कोलाड व ग्रामीण भागात दररोज अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडत आहेत.
रोहा : रोहा तालुक्यासह शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांउला आहे. रोहा, कोलाड व ग्रामीण भागात दररोज अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडत आहेत. चोरट्यांनी पुन्हा मोर्चा कोलाड विभागातील पुई, पुगाव गावाकडे वळविला आहे. पुगाव येथील बंद घराचे कडीकोयंडा तोडून घरातील मुद्देमाल तर पुई येथील बंद घरातील दागिने व अन्य चीजवस्तू चोरल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वारंवार घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांनी नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
रोहा, कोलाड यासह ग्रामीण भागातील अनेकांची घरे फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा तपास सुरू असतानाच चोरट्यांनी मोर्चा कोलाड व अन्य ग्रामीण भागाकडे वळविला. सुतारवाडी, साठलेवाडी, उडदवणे, सांगडे, यशवंतखार, मेंढा या ठिकाणी घरातील रोकड व मुद्देमाल चोरल्याचे समोर आले. या सर्व घटना ताज्या असतानाच पुन्हा शनिवारी रात्री पुगाव, पुई गावातील बंद घरावर चोरट्यांनी डाका टाकला. पुगाव येथील विमल कलमकर यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून घरातील ३५ हजार ५०० रुपयांचे मुद्देमाल तर पुई येथील किरण लहाने यांच्या बंद घरातील तब्बल १ लाख ८६ हजारांचे दागिने व अन्य ऐवज चोरल्याचे समोर आले आहे.
तालुक्यात अनेक घरफोडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना अद्याप काहीच धागेदोरे सापडलेले लाही. त्यात शुक्रवारी रात्री शहरातील महाडकर यांच्या घरातील चोरीची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पुन्हा पुई, पुगाव गावातील बंद घरावर दरोडा टाकून रोहा पोलिसांना नवे आव्हान उभे केले आहे. (वार्ताहर)