अलिबाग : रायगडलोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २६ उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात करण्यात आली. या छाननीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे आणि अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गीते असे दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. २४ वैध उमेदवारांमध्ये विविध पक्षांचे १२ तर अपक्ष १२ उमेदवार आहेत.
युतीचे अधिकृत उमेदवार अनंत गीते यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गीते आणि योगेश दीपक कदम यांच्या उमेदवारी अर्जाच्या ग्राह्यतेबाबत काही आक्षेपाचे मुद्दे छाननीच्यावेळी निर्माण झाले होते, त्यावर उभय उमेदवारांना आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी देऊन अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे रायगडलोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गीते यांच्या नामनिर्देशनपत्रावर सूचक म्हणून माझे नाव टाकण्यात आले आहे, मात्र त्यावरील स्वाक्षरी माझी नाही, असे प्रतिज्ञापत्र अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गीते यांचे सूचक यशवंत गीते यांनी छाननीपूर्वी दाखल केले. छाननीच्या वेळी यशवंत गीते यांना प्रत्यक्ष बोलावून केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) रवींद्र सिंह यांच्या समक्ष त्यांचा जबाब घेवून स्वाक्षऱ्यांची खातरजमा केली.त्यावेळी अपक्ष उमेदवार अनंतपद्मा गीते यांच्या नामनिर्देेशन पत्रावर सूचक म्हणून केलेली सही यशवंत गीते यांची नसल्याचे निष्पन्न झाले. परिणामी अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गीते यांच्या उमेदवारी अर्जावरील अपेक्षित १० सूचकांपैकी एक सूचक बाद झाल्याने उमेदवारी अर्जावर अपुऱ्या सूचक संख्येच्या कारणास्तव त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी पुढे सांगितले.अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गीते यांचे सूचक यशवंत गीते यांनी आपले प्रतिज्ञापत्र जिल्हा सरकारी वकील तथा नोटरी अॅड. संतोष पवार यांच्याकडे नोटराईज करून दाखल केले असल्याचा मुद्दा युक्तिवादात अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गीते यांचे वकील अॅड.सचिन जोशी यांनी मांडून उमेदवारी अर्ज अवैधतेस आक्षेप घेतला होता. त्याबाबत विचारले असता, जिल्हा सरकारी वकील आणि नोटरी हे दोन स्वतंत्र भाग असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. अदिती तटकरे यांनी दाखल केलेला अर्ज पर्यायी अर्ज होता, त्याच बरोबर अर्जासोबत एकच सूचक प्रस्ताव होता, परिणामी अदिती तटकरे यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला आहे. अपक्ष उमेदवार योगेश दीपक कदम यांनी मतदार यादीची प्रमाणित प्रत अर्जा सोबत जोडली नव्हती. त्याकरिता त्यांनाही मुदत देण्यात आली. पाच वाजण्यापूर्वी त्यांनी मतदार यादी प्रमाणित प्रत सादर केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) रवींद्र सिंह, रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उमेदवार, उमेदवारांचे सूचक, वकील व प्रतिनिधी उपस्थित होते.परिणामी छाननीअंती वैध असलेल्या २४ उमेदवारांमध्ये सुनील दत्तात्रेय तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अनंत गंगाराम गीते (शिवसेना), संजय अनंत पाशिलकर (बळीराज पार्टी), नथुराम भगुराम हाते (बहुजन मुक्ती पार्टी ),सुमन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी ), मिलिंद भागुराम साळवी ( बहुजन समाज पार्टी ), मधुकर महादेव खामकर ( अखिल भारत हिंदू महासभा), संदीप पांडुरंग पार्टे ( बहुजन महा पार्टी), विलास गजानन सावंत ( महाराष्ट्र क्र ांती सेना), सचिन भास्कर कोळी( वंचित बहुजन आघाडी), गजेंद्र परशुराम तुरबाडकर (क्र ांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके (भारतीय किसान पार्टी) आणि अपक्ष उमेदवारांमध्ये श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती, अशोक दाजी जंगले, सुनील सखाराम तटकरे , सुनील पांडुरंग तटकरे , सुभाष जनार्दन पाटील ,संजय अर्जुन घाग, अविनाश वसंत पाटील, रामदास दामोदर कदम , अख्तरी जैनुद्दीन चौधरी, योगेश दीपक कदम, अनिल बबन गायकवाड , मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ एप्रिल आहे.तटकरे नामसाधर्म्याच्या दोन उमेदवारांचे अर्ज वैधशिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार अनंत गंगाराम गीतेयांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. त्याच बरोबर नामसाधर्म्याचे उमेदवार अनंत पद्मा गीते यांचा अर्ज अवैध ठरल्याने सेना उमेदवार गीते यांना नामसाधर्म्यातून मते बाद होण्याचा फटका बसणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणाºया सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे या दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत.छाननीतील वैध ठरलेले उमेदवार26अर्जांचीछाननी 24उमेदवारवैध12इतर12अपक्ष