अलिबाग - किहीम आदिवासी वाडी येथे दुपारी झोपलेल्या दोन भावांचा अचानक मृत्यु झाला आहे. याबाबत मांडवा पोलिसांनी आकस्मात मृत्यु म्हणून नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत. आराध्या संदानंद पोळे (६ वर्षे) व सार्थक संदानंद पोळे (३ वर्षे) या अशी मृत पावलेल्या दोन भावंडांची नाव आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शीतल सदानंद पोळे, सदानंद नामदेव पोळे हे आपल्या दोन मुलांसह किहीम येथील दाजीबा पटोले यांच्या वाडीत एक वर्षांपासून काम करत आहेत. रविवारी दुपारी जेवल्यानंतर आराध्या व सार्थक हे झोपले होते. सायंकाळी झोपेतून उठत नाही म्हणून त्यांना उठविण्यासाठी त्यांची आई शीतल गेली असता ती दोन्ही मुल बेशुद्ध अवस्थेत दिसली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांना रात्री आठ वाजताच्या सुमारास मृत घोषित केले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात शीतल सदानंद पोळे व सदानंद नामदेव पोळे यांचे नातेवाईकांनी गर्दी केली होती.
याप्रकरणी मांडवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.रात्री उशिरापर्यंत अधिक चौकशी करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात घेऊन जात सोमवार शवविच्छेदन करून मृतदेह पालकांच्या ताब्यात दिले, या मुलांचे अंतिम विधी करण्यासाठी त्यांच्या मूळगावी पुसद- यवतमाळ येथे घेऊन गेले आहेत. याबाबत जे.जे. रुग्णालय यांचा अंतिम अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे सांगितले.