लाचखोर मीनल दळवी यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी, घरात सापडले ६० तोळे सोने
By राजेश भोस्तेकर | Published: November 12, 2022 03:33 PM2022-11-12T15:33:12+5:302022-11-12T15:34:41+5:30
महिन्याभरापासून लाच लुचपत पथक हे तहसीलदार दळवी याच्या मागावर होते. अखेर ११ नोव्हेंबर रोजी सापळा रचून नवी मुंबई पथकाने फिर्यादी यांच्याकडून दोन लाख घेताना राकेश चव्हाण याला अटक केली.
अलिबाग : अलिबाग तहसीलदार मीनल दळवी आणि एजंट राकेश चव्हाण यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दळवी आणि चव्हाण याना आज शनिवारी न्यायाधीश अशोककुमार भिलारे याच्या न्यायलायात सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोघानाही सोमवारपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचखोर मीनल दळवी यांच्या विक्रोळी येथील घरातून एक कोटी रोकड हस्तगत केली आहे. नवी मुंबई लाचलुचपतच्या कस्टडीत त्यांना ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ऍड भूषण साळवी तर आरोपी पक्षातर्फे ऍड प्रवीण ठाकूर आणि ऍड अंकुश मोरे यांनी काम पाहिले.
फिर्यादी याच्या सासऱ्याना मिळालेल्या बक्षीस पात्र जमिनीवर नाव चढविण्यासाठी आणि सासऱ्याच्या भावाने बक्षीस पत्रावर घेतलेल्या हरकतीचा अपील प्रकरणात निकाल सासऱ्याच्या बाजूंना द्यावा यासाठी तहसीलदार मीनल दळवी यांनी तीन लाखाची लाच मागितली होती. याबाबत फिर्यादी यांनी २८ सप्टेंबर रोजी नवी मुंबई लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. २९ सप्टेंबर रोजी पथकाने याबाबत सत्यता पडताळून रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
महिन्याभरापासून लाच लुचपत पथक हे तहसीलदार दळवी याच्या मागावर होते. अखेर ११ नोव्हेंबर रोजी सापळा रचून नवी मुंबई पथकाने फिर्यादी यांच्याकडून दोन लाख घेताना राकेश चव्हाण याला अटक केली. तर दळवी यांच्यासाठी पैसे घेतल्याचे चव्हाण याने सगितल्याने त्यांनाही अटक करण्यात आली.
शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी दळवी आणि चव्हाण यांना जिल्हा न्यायलायत हजर केले. न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून लाचखोर अधिकारी मीनल दळवी, एजंट राकेश चव्हाण याना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महसूल विभागात भ्रष्ट्राचार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
दळवींकडे साठ तोळे सोने
मीनल दळवी याची दीड वर्षभरापूर्वी अलिबाग तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती. दळवी याना लाच घेतल्याप्रकरणी नवी मुंबई लाच लुचपत पथकाने अटक आहे. त्याच्या अलिबाग येथील घरची तपासणी केली असता साठ तोळे सोने आणि २८ हजार रोकड मिळाली आहे. तर मुंबई विक्रोळी याठिकाणीही दळवी यांची मालमत्ता असून तेथील घरातून एक कोटी रोकड हस्तगत केली आहे.