शेलू येथे उल्हास नदीमध्ये दोघे बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:06 AM2019-05-29T00:06:05+5:302019-05-29T00:06:08+5:30
शेलू गावातील केबिके नगरमध्ये राहणारे रहिवासी उल्हास नदीमध्ये पोहण्यासाठी गेले असता त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला.
नेरळ : शेलू गावातील केबिके नगरमध्ये राहणारे रहिवासी उल्हास नदीमध्ये पोहण्यासाठी गेले असता त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला. उल्हास नदीमध्ये पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मंगळवार २८मे रोजी नेरळजवळील शेलू गावाच्या मागे असलेल्या उल्हास नदीमध्ये सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास पोहायला गेलेल्या तांबे कुटुंबातील आयुष हा १४ वर्षांचा मुलगा पाण्यात उडी मारल्यानंतर तळाशी गेला. त्याला शोधण्यासाठी तेथे असलेले शंकर काळे (४५)यांनी पाण्यात उडी मारून आयुष तांबे याला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शंकर काळे हे देखील पाण्यातून बाहेर येत नाही हे बघून आयुषचे वडील सूर्यकांत तांबे यांनी देखील उल्हास नदीच्या त्या डोहात उडी घेतली. मात्र सूर्यकांत तांबे देखील पाण्याबाहेर येत नसल्याचे बघून तेथे असलेल्या महिलांनी आपल्याकडे कपडे धुण्यासाठी आणलेल्या साड्या पाण्यात सोडल्या त्याला पकडून सूर्यकांत तांबे हे सुखरूप बाहेर आले. मात्र आयुष तांबे आणि शंकर काळे यांचा बुडून मृत्यू झाला. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घटना घडल्यानंतर अर्ध्या तासात पोहचलेले पोलीस पाटील मनोज पाटील यांनी विश्वास मसणे, पुंडलिक मुकणे, दिनेश कालेकर, योगेश कालेकर यांच्या मदतीने तासाभरात आयुष आणि शंकर काळे यांचे मृतदेह बाहेर काढले. आयुष तांबेचा मृतदेह १० फूट खोल पाण्यातून बाहेर काढला असून घटनास्थळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेडगे तसेच पोलीस कर्मचारी वैशाली परदेशी आणि अशोक पाटील हे हजर होते. त्याचवेळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी माणिक सानप हे देखील घटनास्थळी पोहचले होते. त्यानंतर उल्हास नदी परिसरात २००-३०० फुटांचा परिसर शोधल्यानंतर तब्बल सहा तासानंतर शंकर काळे यांचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे.