वनविभागाचे दोन कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 03:34 AM2020-01-03T03:34:02+5:302020-01-03T03:34:15+5:30
महिला वनाधिकारी, वनपाल यांचा समावेश; ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
अलिबाग : फर्निचर बनविण्याचे काम करणाऱ्या पाच सुतारांवर कारवाई न करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ३० हजार रुपयांची लाच घेताना वडखळ वनविभागाच्या वनाधिकारी ललिता सुभाष सूर्यवंशी आणि वनपाल बापू बिरू गडदे या दोघांना रायगड लाचलुचपत विभागाच्या टीमने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे खेड येथील भारत स्वा मीलमधून पासींग लाकूड खरेदी करून लाकडी वस्तू तयार करून देतात. स्वा मीलमधून खरेदी केलेल्या लाकडांचा साठा करण्याचा परवाना न घेता तक्रारदार व त्यांच्याच गावातील चार सुतार फर्निचर बनविण्याचे काम करतात. या पाच जणांवर विनापरवाना फर्निचर बनविण्याचा ठपका ठेवून कारवाई करण्याचे नाटक वडखळ वनविभागाच्या वनाधिकारी ललिता सूर्यवंशी आणि वनपाल बापू गडदे यांनी केले. त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी प्रत्येक सुताराकडून या दोघांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी केली, यामुळे या पाच सुतारांकडून एकत्रितपणे ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.
या दरम्यान तक्रारदारांनी याबाबतची तक्रार रायगड लाचलुचपत विभागाकडे केली. तक्रारदाराच्या तक्रारीची शहानिशा करून अँटीकरप्शनने सापळा रचला. लाचेची मागणी करून लाचखोर वनाधिकारी आणि वनपाल यांनी तडजोडीअंती ३० हजार रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदारांनी या दोघांना ३० हजार रुपये देण्यासाठी दिवस ठरवण्यात आला. यादरम्यान पोलीस उपअधीक्षक अधिकराव पोळ, पोलीस निरीक्षक किशोर साळे, पोलीस हवालदार दीपक मोरे, पोलीस हवालदार बळीराम पाटील, महेश पाटील, विशाल शिर्के , पोलीस नाईक सुरज पाटील आणि स्वप्नाली पाटील यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना रंगेहाथ अटक केली.