आगरदांडा बंदरात तटरक्षक दलातर्फे दोन महाकाय बोटी दाखल, अतिजलद पेट्रोलिंग होणार शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 04:36 AM2021-04-02T04:36:16+5:302021-04-02T04:36:51+5:30
रायगड जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी गुरुवारी भारतीय तटरक्षक दलाच्या दिमतीला आगरदांडा बंदरात अग्रीम आयसीजीएस व अचूक आयसीजीएस हे दोन सुसज्ज जहाजे तैनात करण्यात आली आहेत.
आगरदांडा : रायगड जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी गुरुवारी भारतीय तटरक्षक दलाच्या दिमतीला आगरदांडा बंदरात अग्रीम आयसीजीएस व अचूक आयसीजीएस हे दोन सुसज्ज जहाजे तैनात करण्यात आली आहेत. ५० मीटर बाय ७ मीटर लांबीच्या या अत्याधुनिक जहाजांमुळे अतिजलद पेट्रोलिंग शक्य होणार असून रायगडच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ वा तुफानी वाऱ्यापासून खोल समुद्रात मच्छीमारांना उद्भवणाऱ्या संकटाचा मुकाबला करणे व मदतीचा हात देणे शक्य होणार आहे.
मुंबई येथे १९९३ साली बॉम्बस्फोट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सागरी सुरक्षेला खूप महत्त्व देण्यात आले. तद्नंतर तटरक्षक दलाची ठिकठिकाणी टेहळणी केंद्र निर्माण होऊन अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी सागरी सुरक्षा दल सोबत भारतीय तटरक्षक दलाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर आगरदांडा येथे भारतीय तटरक्षक दलाचे टेहळणी केंद्र तयार करण्यात आले आहे. सुरुवातीला टेहळणी करण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या होड्यांचे साह्य घेऊन टेहळणी करण्यात येत होती. परंतु आता स्वतंत्र मोठ्या बोटी आल्याने आगरदांडा टेहळणी केंद्राला खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अतिरेकी कारवायांवर नजर ठेवता ठेवता स्थानिक मच्छीमार हे समुद्रात संकटात सापडल्यावर या महाकाय बोटींचे मोठे सहाय्य्य प्राप्त होणार आहे.अमली पदार्थांची तस्करी रोखणे, अतिरेक्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे तसेच समुद्रात उदभवणाऱ्या अस्मानी, सुलतानी संकटाप्रसंगी बचाव कार्यात नेहमीच तटरक्षक दल कार्यरत असते. दोन बोटींमुळे पेट्रोलिंग खूप लांबवर होऊन खोल समुद्रात होणाऱ्या अतिरेकी कारवायांवर पायबंद ठेवता येणार आहे.