लग्नाची वरात संपल्यानंतर दोन गटांत हाणामारी, तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:36 PM2019-05-27T23:36:28+5:302019-05-27T23:36:32+5:30
कर्जत तालुक्यातील वंजारपाडा गावात लग्नाची वरात संपल्यानंतर दोन गटात हाणामारी झाली.
नेरळ : कर्जत तालुक्यातील वंजारपाडा गावात लग्नाची वरात संपल्यानंतर दोन गटात हाणामारी झाली. नवरा नवरी घरात जात असताना दार धरण्याची प्रथा आहे. दरवाजा अडवून पैशाची मागणी करत असताना समजवायला गेलेल्यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्या हातातील काठ्या, तलवारी, लोखंडी रॉड, अशी हत्याराने मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात तीन जण जखमी झाले असून यात परस्पर विरोधी दोन्ही गटातील २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वंजारपाडा गावातील अंकुश भवारे याचे २६ मे रोजी लग्न होते. लग्नाची वरात संपल्यानंतर नवरा नवरी घरात जात असताना दरवाजा अडविण्याची प्रथा आहे. दरवाजा अडवून बक्षीस म्हणून पैशाची मागणी करत असताना नवरदेव देत असलेले पैसे न घेता २ हजार रुपयेच पाहिजेत असा हट्ट धरून नवरा नवरीला एक तास दारातच ताटकळत ठेवले, म्हणून साक्षीदार हे समजवायला गेले असता तेथील जमावाने फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ, व दमदाटी करून त्यांच्या हातातील काठ्या, लोखंडी रॉड पहारी या हत्याराने दुखापत केली आहे. यात विशाल चिंधू भवारे, अनिकेत तानाजी भवारे हे जखमी झाले आहेत, रवींद्र रामदास हजारव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारहाण करणारे मयूर शांताराम विरले, विशाल अनंता विरले, कैलास तुकाराम विरले, संदेश शांताराम विरले, शांताराम जाणू विरले, तुकाराम जाणू विरले, विलास तुकाराम विरले, समीर गजानन मिसाळ व तीन महिला यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या गटात बुवा उर्फ मधुकर हिराजी धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काहीही कारण नसताना जमावपैकी काही जणांनी शर्टची कॉलर धरून खेचली तेव्हा फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व तुळशीमाळ तुटून नुकसान झाले
आहे. तसेच यातील एकाने फिर्यादीच्या डोळ्यात दुखापत केली आहे.
>२१ जणांवर गुन्हे दाखल
अमर तुकाराम मिसाळ, समीर गजानन मिसाळ, दत्तात्रेय बाबू मिसाळ, दत्ता गोपाळ कमलाकर, विनोद भरत माळी, हरिचंद्र गोविंद कालेकर, चिंधू श्रीपत माळी, धनेश मंगळ मिसाळ, सागर बुधाजी मिसाळ, जितेंद्र रामदास आगे अशा दोन्ही गटातील २१ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.