दोनशे इमारती धोकादायक माणगावच्या पाच गावातील दहा बांधकामे अतिधोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 11:53 PM2020-09-06T23:53:28+5:302020-09-06T23:53:35+5:30

नगरपंचायतीच्या मालकांना नोटिसा

Two hundred buildings dangerous Ten constructions in five villages of Mangaon are extremely dangerous | दोनशे इमारती धोकादायक माणगावच्या पाच गावातील दहा बांधकामे अतिधोकादायक

दोनशे इमारती धोकादायक माणगावच्या पाच गावातील दहा बांधकामे अतिधोकादायक

Next

- गिरीश गोरेगावकर

माणगाव : माणगाव नगरपंचायत हद्दीतील पाच मुख्य गावांतील सुमारे २०० इमारती व घरे धोकादायक झाली आहेत. त्यातील १० इमारती अतिधोकादायक असल्याने, त्या मालकांना व भाडेकरूंना इमारती खाली करण्यासाठी लेखी नोटिसा नगरपंचायतीने बजावल्या आहेत.

नगरपंचायतीच्या कार्यालयात नगररचनाकार हे पद गेल्या ५ वर्षांपासून रिक्त असल्याने, या २०० जणांना स्ट्रक्चर आॅडिट करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. महाड येथे २४ आॅगस्ट रोजी झालेल्या इमारत दुर्घटनेच्या अनुषंगाने माणगांव नगरपंचायतीमार्फत शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये जीर्ण व मोडकळीस आलेल्या २०० इमारती व घरे आढळून आली.

नगरपंचायत अधिनियम १९६५च्या कलमानुसार, ८ दिवसांच्या आत स्ट्रक्चरल इंजिनीअरकडून प्रमाणपत्र सादर करण्यात यावे, अन्यथा या इमारती मानवी वस्तीसाठी अयोग्य आहेत, असे मानून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर, या इमारतींमधील व घरे यातील वास्तव्य व वापर त्वरित बंद करण्यात यावा, तसेच कोणत्याही कारणासाठी इमारत वापरण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे, संभाव्य अपघातापासून होणारी हानी टाळण्यासाठी इमारतीभोवती सुरक्षित जाळी आणि पत्र्याचे कुंपण घालण्यात यावे, असे नगरपंचायतीने धोकादायक इमारतीच्या मालकांना कळविले आहे.

विशेष म्हणजे, माणगांव नगरपंचायतीची इमारतच अति धोकादायक बनलेली आहे. या इमारतीला ५० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या इमारतीचा मागील भाग व स्लॅब ठिकठिकाणी कोसळला आहे. त्यामुळे येथील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. नगरपंचायतीने नगररचनाकारांकडे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यास दिले आहे. मात्र, त्याचा अहवाल अद्यापही आलेला नाही. ही इमारत ५ वर्षांपासून धोकादायक बनली असल्याने, येथे नवीन इमारत होणे सर्वांच्या दृष्टीने गरजेचे आहे, परंतु सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेमुळे ही नवीन इमारत होऊ शकलेली नाही.

खास बाब म्हणजे माणगांव नगरपंचायत अस्तित्वात येऊन ५ वर्षे झाली, तरी नगररचनाकार अभियंता हे पद रिक्त आहे. त्यामुळे खासगी अभियंत्याकडून इमारत मालकांसोबत नगरपंचायतीलाही आॅडिट करून घ्यावे लागत आहे.
या इमारतींमध्ये अजूनही लोक राहत आहेत. त्यांच्या जिवाला धोका संभवत आहे. त्यांच्यावर कारवाई न केल्यास, माणगांव शहरातही महाडसारखी दुर्घटना होऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

माणगांव शहरात कचेरी मार्गावरील गणेश कॉम्प्लेक्स, मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स, बाजारपेठेतील दत्त मंदिरसमोरील रोहेकर बिल्डिंग, समृद्धी हॉटेलजवळील वांगरे बिल्डिंग, विद्यानगर येथील मापकर चाळ, निजामपूर मार्गावरील जगदाळे बिल्डिंग, मोर्बा रोड येथील धनसे, सहारा, सकिना बिल्डिंग या इमारती अतिधोकादायक झाल्या असून, या इमारतीचे मालक व भाडेकरू यांना तातडीने इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Two hundred buildings dangerous Ten constructions in five villages of Mangaon are extremely dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड