रायगडमधून दोन अनंत गीते अन् 2 सुनिल तटकरे निवडणूक लढविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 05:30 AM2019-04-04T05:30:49+5:302019-04-04T05:31:18+5:30
नामसाधर्म्याची परंपरा कायम : मते बाद करण्यासाठी एकसारखे नाव असलेला उमेदवार देण्याची शक्कल
अलिबाग : अधिकृत उमेदवारांची मते बाद करण्याकरिता एकसारखे नाव असलेला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची रायगड लोकसभा मतदारसंघाची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अनंत पद्मा गीते यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे दाखल केला आहे.
अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गीते यांच्याबरोबरच मंगळवारी बहुजन समाज पार्टीचे मिलिंद भागुराम साळवी (२ अर्ज), अखिल भारत हिंदू महासभाचे मधुकर महादेव खामकर, बहुजन महापार्टीचे संदीप पांडुरंग पार्टे अशा एकूण चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेल्या २८ मार्च रोजी प्रारंभ झाल्यापासून मंगळवारपर्यंत नामनिर्देशनपत्रे भरलेल्या उमेदवारांची संख्या १२ झाली आहे.
तटकरेही ‘डबल’
नामसाधर्म्याचे अनंत गीते मंगळवारी निवडणूक रिंगणात आल्यावर, बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्या नामसाधर्म्याचे सुनील सखाराम तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे.