मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात ३५ जखमी, कंटेनरची दोन मिनी बसला धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 12:50 AM2019-10-07T00:50:52+5:302019-10-07T00:51:04+5:30
माणगाव पोलीस ठाण्यात कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर माणगावनजीक ढालघर फाटा येथे रविवारी पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन टेम्पोट्रॅव्हलमधील ३५ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी सात जणांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
अपघातग्रस्त कंटेनर क्र. एम.एच ४६ ए.आर. ९४५९ वरील चालक कंटेनर हा मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याकडून मुंबई बाजूकडे जात होता. कंटेनरचालक बेदरकारपणे वाहन चालवून माणगाव ढालघर फाटा जवळ आला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चुकीच्या बाजूला जाऊन माणगावकडून महाडकडे जाणाऱ्या मिनी बस क्र. एम एच ०८ ई ९२६१ ला धडकला. ही बस जोरात पाठीमागे जाऊन एम एच ४३ एच ४९४१ या मिनी बसवर आदळली. अपघातात दोन्ही मिनी बसमधील ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी प्रियांका बैकर (४०), कृष्णा बैकर (५५), प्रीती रेमजे (४०), अंजली शिगवण (३५), जगदीश गोवळे (२४), गजानन गोवळे (४५), प्रथमेश खानविलकर (२८) या सात जणांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार सायगावकर करीत आहेत.