बोरघाटात बस दरीत कोसळून अपघात, दैव बलवत्तर म्हणूनच वाचले 45 भाविकांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 10:25 AM2018-10-05T10:25:26+5:302018-10-05T10:29:35+5:30
खोपोलीचे जैन धर्मीय भाविक तीर्थ यात्रेवरून परतत असताना बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळील तीव्र वळणावर बस दरीत कोसळल्याची घटना घडली.
नितीन भावे
खोपोली - खोपोलीचे जैन धर्मीय भाविक तीर्थ यात्रेवरून परतत असताना बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळील तीव्र वळणावर बस दरीत कोसळल्याची घटना घडली. 30 फूट खोल गेल्यावर झाडाला अडल्यामुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी वाचले. बसमध्ये 45 प्रवासी होते. त्यात पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. रात्री 11.30 च्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.
गुरुवारी (4 ऑक्टोबर) सकाळी खोपोली व शिळफाटा येथील जैन धर्मीय भाविक 4 बस घेऊन पाबळ येथे तीर्थयात्रेला गेले होते. तिथून परतत असताना, घाट उतरताना शिंग्रोबा मंदिराच्या वरच्या वळणावर एक बस दरीत कोसळली. परंतु केवळ दैव बलवत्तर म्हणून दोन झाडांमुळे बस अडकली. त्यामुळे सर्व प्रवासी वाचले. बोरघाट पोलीस, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, शेखर जांभळे, पोलिस निरीक्षक हेगाजे हे तात्काळ मदतीसाठी धावले.