वावोशी : खालापुरातुन जाणाऱ्या महामार्गावर गुरुवारी तीन अपघात झाले. यात दोघांचा मृत्यू तर अठरा जखमी झाले आहेत. हे तीन अपघात वाहन चालकांच्या हलगर्जीमुळेच झाल्याचे समोर येत आहे. मुंबई-पुणे महामार्गावर रसायनी गावाजवळ बुधवारी मध्यरात्री एक कार पुण्याकडून मुंबईकडे जात असताना वाहन चालकाचा ताबा सुटल्याने कार दोन रस्त्यांच्या लेनमध्ये असणारा सुरक्षा कठडा तोडून जवळपास ३० फूट खोल मोरीत पडली. या कारमध्ये पाच प्रवासी होते, त्यातील एक जागीच ठार झाला. चौघांना उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.तर अहमदनगरहून मुंबई येथे जाणारी स्कार्पिओ कार मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र मांक चारवरून जात असताना पहाटे चारच्या दरम्यान त्या कारला ट्रकने दिली. या अपघातात कारमधील आठ प्रवासी जखमी झाले. त्यांना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तिसरा अपघात गुरुवारी दुपारी राजगुरूनगरहून मुंबईकडे जाणाऱ्या पिकअप जीपचा अपघात झाला. या पिकअप जीपमधून १७ जण एका कार्यक्रमासाठी जात असताना अमृतांजन पुलाच्या वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बाजूला असणाऱ्या सुरक्षा कठड्याला आदळून जीप उलटून अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खोपोली पालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील तिघे गंभीर जखमी आहेत. (वार्ताहर)
खालापुरात तीन अपघातांत दोन ठार
By admin | Published: March 31, 2017 4:02 AM