वारे गावात पाण्यासाठी दोन किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 01:11 AM2019-03-24T01:11:30+5:302019-03-24T01:11:39+5:30

मार्च महिन्यातच कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासी वाडे-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. वारे ग्रामपंचायतीतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे.

A two kilometer long walk to water in Vare village | वारे गावात पाण्यासाठी दोन किमीची पायपीट

वारे गावात पाण्यासाठी दोन किमीची पायपीट

googlenewsNext

- कांता हाबळे

नेरळ : मार्च महिन्यातच कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासी वाडे-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. वारे ग्रामपंचायतीतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे.
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम डोंगराळ भागात नवसुचीवाडी, हऱ्याचीवाडी, जांभूळवाडी या आदिवासी वाड्या आहेत. या वस्त्यांवर सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, महिलांना डोंगराळ रस्ता पार करून पाणी आणावे लागत आहे. या वाड्या-वस्त्यांवर मागील काही वर्षांपूर्वी शासनाने लाखो रुपये खर्चून पाणी योजना राबविल्याही आहेत; परंतु नियोजनांचा अभाव व ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामांमुळे त्या योजना नादुरु स्त झाल्या आहेत. परिणामी, या भागातील लोकांना नळपाणी योजनांचा लाभ आजतागायत घेता आला नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
ग्रामस्थांना डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या विहिरी, नाल्यातून पाणी आणावे लागते. काही ठिकाणी नदीपात्रात खड्डे खोदून गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यासाठी रोजच दोन-तीन किमीची पायपीट करावी लागत आहे. या भागातील आदिवासी बांधव मोलमजुरी, भाजीपाला लागवड व अन्य कष्टाची कामे करून उपजीविका करतात. महिलांचा बहुतांश वेळ पाणी भरण्यात जात असल्याने रोजगारावरही परिणाम होत आहे, त्यामुळे टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.

पाणीटंचाईमुळे पहाटे उठून पाणी भरावे लागत आहे. त्यासाठी वाडीपासून दूर पायथ्याशी असलेल्या विहिरीतून पाणी भरावे लागत आहे. त्यात रस्ता खराब व चढाचा असल्याने दमछाक होत आहे. मोलमजुरीही करता येत नाही.
- भागीबाई पारधी,
ग्रामस्थ, जांभूळवाडी

आमच्या वाडीतील पाणी योजना बंद आहे. फक्त शोसाठी पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत; परंतु आजपर्यंत नळांना पाणी काही आले नाही. यासाठी लोकप्रतिनिधींसह शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
- नरेंद्र दुदा,
ग्रामस्थ, जांभूळवाडी

वारे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाड्या-वस्तीवरील पाणीटंचाईचा आढावा घेऊन त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही ग्रामपंचायतीकडून केली जाईल.
- योगेश राणे, सरपंच, ग्रुपग्रामपंचायत वारे

Web Title: A two kilometer long walk to water in Vare village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी