विजय मांडेकर्जत : कर्जत तालुक्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या मुरबाड तालुक्यातील सिद्धगड किल्ला आपली अखेरची घटका मोजत आहे. किल्ल्याची ओळख असलेला दिंडी दरवाजा कोसळण्याच्या स्थितीत आहे. दरम्यान,पुरातत्व विभाग या पुरातन वास्तूकडे दुर्लक्ष करीत असल्याने ऐतिहासिक पाऊलखुणा इतिहासजमा होण्याची भीती संशोधक व्यक्त करीत आहेत.
सिद्धगड हा किल्ला शिवपूर्व अगोदरचा असून या किल्ल्याची निर्मिती कधी झाली याबाबत इतिहासात नोंद नाही. एका बाजूला पुणे जिल्ह्याची हद्द आणि एका बाजूला रायगड जिल्ह्याची हद्द असलेला हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा असून बोरवाडी आणि उचले गावावरून किल्ल्यावर जाता येते.तसेच भट्टीच्या रानातूनही एक अवघड वाट आहे. किल्ल्यावर जाताना भिवाचा आखाडा आणि भट्टीच्या रानातून जाताना अशा दोन ठिकाणी दिंडी दरवाजे लागतात.त्या रस्त्यावर पवित्र नारमातेचे आणि डेरमातेची मंदिरे आहेत.भक्कम तटबंदी असलेला हा किल्ला पूर्वेला बारामाही पाण्याची कुंडे आणि गुहा कोरलेल्या अवस्थेत आहे. समुद्र सपाटीपासून २५00 फूट उंचीवर असलेला हा किल्ला फक्त आता घरांची दगडी जोते सोबत घेऊन निपचित पडलाय. या किल्ल्यावर महादेव कोळी लोकांची वस्ती असून किल्ल्याची उभारणी झाली तेव्हा किल्ल्याची सुभेदारी किल्लेदार राहुजी पवार पाहत होते. वसईच्या लढाईत राहुजी पवार यांनी मर्दुमकी गाजविल्यामुळे चिमाजी आप्पा यांनी त्यांना झुंजारराव ही पदवी दिली. ब्रिटिश अदमानीत वतन खालसा झाल्याने हेच किल्लेदार आपल्या नेवालपाडा येथे आले. तेव्हापासून या किल्ल्याची जी अधोगती सुरू झाली ती आजवर थांबली नाही. किल्ल्यावर जाण्यासाठी साधी पायवाट देखील नाही.वास्तव्य करून राहिलेल्या येथील लोकांना गावात जाण्यासाठी निदान साधी पायवाट तरी करून द्या अशी आर्त मागणी सरकार दरबारी पोहचत नाही. वारंवार मागणी करूनही शासन मात्र त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाही.उलट या लोकांना या ठिकाणाहून हलविले जात आहे.
हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदानाने हा परिसर पुनीत झालेला आहे. गर्द वनराईत असलेला हा किल्ला पूर्णपणे पडला आहे. शिवपूर्व काळातील हा किल्ला तेथे असलेल्या दिंडी दरवाजामुळे ओळख सोडून उभा आहे. पण तोच दिंडी दरवाजा अखेरची घटका मोजत आहे. किल्ल्याचा इतिहास आणि अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. स्थानिकांनी सातत्याने पुरातत्व खात्याकडे पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटून माहिती देऊन देखील त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने हा सिद्धगड किल्ला इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.अनेक पावसाळे खाल्लेला हा किल्ला आपले अस्तित्व केवळ शासन उदासीनता यामुळे हरवून बसला आहे.किल्ल्याचा इतिहास आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, किल्ल्यावर पोर्तुगीजकालीन तोफ आहे. सतीची समाधी आहे, व्यापारी तांडे उतरण्याची सोय आहे. पण किल्ल्याची डागडुगी केली गेली नाही. निदान आहे ते वैभव सांभाळावे, नाहीतर पुढच्या पिढीला हे ऐतिहासिक वैभव पाहता येणार नाही.- गिरीश कंटे,इतिहास संशोधक