श्रीवर्धन आगारात दोन नवीन स्लीपर कोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 11:49 PM2020-10-04T23:49:30+5:302020-10-04T23:49:44+5:30
रात्री प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार; नव्या रूपात एसटीची ‘रातराणी’ प्रवाशांच्या सेवेत दाखल
बोर्ली पंचतन : एसटी महामंडळाच्या वतीने शयनयान(स्लीपर) व आसन अशा दोन्ही व्यवस्था असलेल्या एसटी बसचे शनिवारी श्रीवर्धन आगारात लोकार्पण करण्यात आले. श्रीवर्धन नालासोपारा २०:४५ व नालासोपारा श्रीवर्धन २२:०० या मार्गावर पहिली बस चालविण्यात येणार आहे. एसटीच्या ‘रातराणी’ बस म्हणून या बसेस धावणार आहेत.
श्रीवर्धन आगारात सध्या साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही अशा विविध बसद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. रात्रीच्या वेळेस लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडून स्लीपर बसेसला प्राधान्य देतात, तसेच मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना पुश बॅक आसन व्यवस्था उपयुक्त ठरते. या दोन्ही गरजांचा विचार करून एसटी महामंडळाने ३० पुश बॅक आसने व १५ शयन (बर्थ) असलेली बस श्रीवर्धन आगारात प्रवाशांच्या सेवेत दाखल केली आहे. या बसचा तिकीट दर (शयन-आसन या दोन्हीसाठी) हिरकणी बस दराएवढा आहे,तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार दिनांक ५ आॅक्टोबर रोजी श्रीवर्धन बोर्लीमार्गे मिरज बस सुरू करण्यात येणार आहे. श्रीवर्धन बोर्ली मिरज सुटण्याची वेळ सकाळी ५:४५ तर मिरज बोर्ली श्रीवर्धन सुटण्याची वेळ ७:३० आहे, तरी प्रवाशांनी खासगी वाहनापेक्षा एसटीने प्रवास करावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
अशा आहेत बसच्या वेळा
गाडीचे नाव गाडी सुटण्याची वेळ
श्रीवर्धन -मुंबई सकाळी ५, ८ आणि ११:१५,
दुपारी २:१५ वाजता
श्रीवर्धन- बोर्ली -मुंबई सकाळी ६:०० वाजता
श्रीवर्धन -गोरंगाव - पूणे दुपारी २:०० वाजता
श्रीवर्धन बोर्ली- नालासोपारा दुपारी १३:०० वाजता
श्रीवर्धन- मुंबई दुपारी १६:०० वाजता
दिघी- मुंबई दुपारी ४:३० वाजता
श्रीवर्धन -बोर्ली- बोरीवली सकाळी ११:०० वाजता
श्रीवर्धन- बोर्ली-नालासोपारा सकाळी ७:०० वाजता