पोलादपूर : येथे अजय सुतार इलेक्ट्रिशन व दीपक दरेकर मोटारसायकल मेकॅनिकल या दोघांना प्रभातनगर येथील दुकानात घुसून सतीश मोरेसह त्याच्या १० ते १२ साथीदारांनी जबर मारहाण केली आहे. ही घटना १६ व १७ मे रोजी घडली. या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश मोरे हा त्याच्याकडील डम्परचे पासिंग करण्यासाठी इंडिकेटर लॅम्पचे काम करण्यासाठी १६ मे रोजी इलेक्ट्रिशनकडे गेला; परंतु कोणत्याही इलेक्ट्रिशनकडे काम होऊ शकत नसल्यामुळे तो अजय सुतार याला वारंवार हे काम करून देण्यासाठी सांगू लागला. अजय सुतार यांच्याकडे कामाचा भार अधिक असल्यामुळे अजयने नाईलाज व्यक्त केला; परंतु सतत सतीश मोरेचा फोन येत असल्याने अजयने त्याला रात्री उशिरा काम करण्याचा प्रयत्न करतो, असा शब्द दिला; परंतु रात्री उशिरापर्यंत अजय सुतारची कामे चालू होती व रात्री ८ वाजता अजय हा त्याच्या गॅरेजमध्ये आला असता तेथे डम्पर घेऊन सतीश मोरेचा वाहनचालक आला व त्या पाठोपाठ सतीश मोरेदेखील आला. त्या वेळी अजयने जेवूूून येईपर्यंत येथे थांबा सांगून तो जेवणासाठी घरी गेला असता, एका मित्राच्या झायलो गाडीचे दरवाजे लॉक होऊन माणसे अडकली होती, त्यामुळे तातडीने अजयने त्या गाडीचे काम केले व घरी जेवण करून गॅरेजला डम्परचे काम करण्यासाठी पोहोचला. या ठिकाणी पोहोचला असता सतीश मोरे हा त्याला दारू पित असताना आढळला व त्याला पाहताच चालकासह सतीश अजयच्या अंगावर धावून गेले. या वेळी अजयला येथील स्थानिक तरुणांनी वाचविण्यासाठी बाजूला केले आणि अजयने त्यांना त्यांची गाडी घेऊन जाण्यास सांगितले.
दुसऱ्या दिवशी अजयच्या गॅरेजवर सतीशच्या जवळच्या एका तरुणाने अजयला सांगितले की, सतीश तुला जाब विचारायला येणार आहे. अजयने ही गोष्ट तेवढ्या गांभीर्याने घेतली नाही व सायंकाळी तो शिवाजी चौक येथील पेट्रोल पंपात पैशाच्या कामासाठी जाऊन गॅरेजला आला असता, सतीश मोरे (रा. काटेतळी, पोलादपूर), गणेश मोरे (रा. काटेतळी, पोलादपूर), अरुण उतेकर (रा. काटेतळी, पोलादपूर), प्रतीक मोरे (रा. काटेतळी, पोलादपूर) यांच्यासह काटेतळी येथील १० ते १२ सहकारी अजयच्या बाजूला असलेल्या दीपक दरेकर याच्या गॅरेजमध्ये घुसून त्याला मारहाण करत असताना अजय दीपकला वाचविण्यासाठी गेला, या वेळी सर्वांनी अजयलासुद्धा मारहाण केली. तेथील रहिवासी किरण पोतदार सोडविण्यास गेले, त्यांनादेखील धक्काबुक्की केली. या मारहाणीत दीपक दरेकर याच्या हाताची बोटे फॅक्चर झाली असून, अजय सुतार यांच्या छातीला, डाव्या बाजूच्या डोळ्याच्या खाली दुखापत झाली आहे.
या प्रकरणी सतीश मोरे (रा. काटेतळी, पोलादपूर), गणेश मोरे (रा. काटेतळी, पोलादपूर), अरुण उतेकर (रा. काटेतळी, पोलादपूर), प्रतीक मोरे (रा. काटेतळी, पोलादपूर) यांच्यासह काटेतळी येथील १० ते १२ जणांवर विविध कलमान्वये पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेत असलेल्या आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली असून, बाकी आरोपी फरार आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.दुकानदारांमध्ये भीतीपोलादपूरमधील प्रभातनगरमध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे लहान-मोठे दुकानदार, व्यावसायिक भयभीत झाले आहेत. अशा प्रकारे दमदाटी होऊ लागली तर काम कसे करायचे, अशा चिंतेत येथील दुकानदार आहते. या मारहाणीच्या घटनेमुळे नागरिकांमध्येही भीती पसरली आहे.