नागोठणे : शहरात मागील दोन दिवस दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी दहशत निर्माण करून २१ जणांचा चावा घेतला होता. मात्र, यातील एका कुत्र्याला येथील खडकआळीतील तरुणाने त्याला चावा घेताना पकडून यमसदनी पाठविल्याने नागरिकांनी सुटके चा श्वास घेतला, तर दुसऱ्या कुत्र्याला ग्रामपंचायतीच्याच एका कर्मचाºयाने पकडल्याने सध्यातरी नागोठणेकरांवरील संकट टळले आहे. मात्र, ग्रामपंचायतीने यावर काही तरी उपाययोजना करावी या मागणीला पुन्हा जोर धरू लागला आहे.शहराच्या विविध भागात बुधवारपासून पिसाळलेल्या कुत्र्यांनी थैमान घातल्याने सर्व नागरिक भयभीत झाले होते. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांत या कुत्र्यांनी साधारणत: २१ जणांना दंश केला होता व त्यात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका महिलेचाही समावेश होता. अशाच वेळी गुरुवारी चेहºयाचा चावा घेण्यासाठी या पिसाळलेल्या कुत्र्याने खडकआळीतील एका तरुणाच्या अंगावर उडी मारली असता, त्या तरुणाने जीवावर उदार होत त्या कुत्र्याची मान धरून त्याला आपटल्याने कुत्रा गतप्राण झाला. या प्रकारानंतर दोन दिवस भीतीच्या सावटाखाली वावरणाºया नागरिकांनी सुस्कारा सोडला. चावा घेतलेल्या बाधितांनी दवाखान्याचा मार्ग पत्करला होता. या प्रकाराबाबत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संवाद साधला असता, मागील दोन दिवसांत येथे दहा श्वानदंश बाधित रुग्ण दाखल झाल्याचे सांगितले. ज्यांच्या चेहºयाचा चावा घेतला होता, त्या रुग्णांना पुढील उपचारासाठी अलिबागच्या रुग्णालयात पाठविण्यात आले होते, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. श्वानदंशावरील २०० इंजेक्शन आजही येथे उपलब्ध असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याने त्याची नोंद आमच्याकडे नसल्याचे त्यांच्याकडून या वेळी स्पष्ट करण्यात आले.
नागोठण्यात दोन दिवसांत २१ जणांना कुत्र्याने घेतला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:58 PM