ऑनलाइन लोकमत जंजिरा, दि. 19 - भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेत आज दोन अत्याधुनिक बोटी विधीवत दाखल झाल्या. मुरुड जंजीरा येथील दिघी पोर्ट येथे हा शानदार सोहळा संपन्न झाला.भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक के. आर. नौटीयाल यांच्याहस्ते या बोटी सेवेत दाखल करुन घेण्यात आल्या. यावेळी पश्चिम विभागाचे उप महानिरीक्षक मुकूंद गर्ग, कमांडंट अरूण सिंग, जे. एल .मेहता यांच्यासह अन्य मान्यवर व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तटरक्षक दलात दाखल झालेल्या या बोटींचे वैशिष्ट्ये याप्रमाणे-या बोटीची लांबी 27.42 मीटर्स असून वजन 136 टन आहे. एल ॲण्ड टी शिप बिल्डींग चेन्नई येथे या बोटींची बांधणी झाली असून 20 नॉटस मध्ये 500 नॉटीकल मैल या वेगाने या बोटी प्रवास करु शकतात. हा वेग 45 नॉट्स पर्यंतही वाढविण्याची क्षमता आहे. अत्याधुनिक संचार आणि नाविक सुविधांनी सज्ज असलेल्या या बोटींवर 12.7 मीमी मशिन गन्सनेही सज्ज आहे. वेगवान दळणवळण, किनाऱ्याच्या अगदी जवळून गस्त घालणे, शोध कार्य, सुटकेसाठीचे कार्य आणि सागरी सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा वैशिष्ट्यांनी या बोटी सज्ज आहेत. या बोटींमुळे राज्याच्या 720 कि.मी लांबीच्या समुद्र किनाऱ्याची सागरी सुरक्षा अधिक बळकट झाली आहे. त्यामुळे अवैध वाहतुक, मासेमारी, तस्करी अशासारख्या अवैध कृत्यांना आळा घालणे शक्य होणार आहे.
या दोनही बोटी (सी 433 व सी 434) या मुरुड जंजीरा येथील तटरक्षक दलाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असतील आणि तेथून त्या कार्यान्वित असतील. डेप्युटी कमांडंट जसप्रित सिंग धिल्लों आणि जाहिद आफ्रान हे या बोटींचे नियंत्रक अधिकारी आहेत.या कार्यक्रमाला अलिबाग येथील एन.सी.सी.चे विद्यार्थी, भारतीय तटरक्षक दलाचे जवान, मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.