मधुकर ठाकूर
उरण: शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चिरनेर गावात संशयितरित्या शिरलेल्या दोघा संशयितांना गावकऱ्यांच्या गस्ती पथकांनी पकडून चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान त्यांचे अन्य साथीदार रस्त्यात चारचाकी सोडून पळून गेल्याने संतप्त झालेल्या जमावाने त्यांची चारचाकी जाळून टाकली आहे. उरण परिसरातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसही चोरट्यांना जेरबंद करण्यात अपयशी ठरल्याने चिरनेर ग्रामस्थांनी पोलिसांवर अवलंबून न राहता चोरांना पकडण्यासाठी युवकांची गस्ती पथके तयार केली आहेत. ही युवकांची गस्ती पथकेच रात्रभर तैनात राहून गावात खडा पहारा देत आहेत. पोलिस आणि गस्ती पथक "जागते रहो " चा नारा देत असतानाच शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत चिरनेर गावात प्रवेश केला होता. स्थानिक गस्ती पथकाला यांचा सुगावा लागताच सावध झालेल्या अज्ञात चोरट्यांनी गावाबाहेर धुम ठोकली होती.
मात्र गस्ती पथकाने चोरट्यांचा दुचाकींवरून पाठलाग केला खरा. मात्र चारचाकीतून आलेले अज्ञात चोरट्यांनी पाठलाग करणाऱ्या गस्ती पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. त्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा चिरनेर गावात शिरलेल्या संशयितांचा गस्ती पथकाने पाठलाग करताना दोन संशयित हाती लागले. संशयितांना गस्ती पथकानी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान पाठलाग करत असलेल्या गस्ती पथकाचा आवेश पाहून दोन संशयितांचे साथीदार अंधारातच रस्त्यातच चारचाकी सोडून पळून गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने रस्त्यावरच सोडून गेलेल्या संशयितांची चारचाकीलाच आग लाऊन पेटवून दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीनंतरच चोर की साव यांचा उलगडा होणार आहे. पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली.