कशेडी घाटात दोन टँकरला अपघात; चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 05:40 AM2019-04-20T05:40:16+5:302019-04-20T05:40:18+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दोन वेगवेगळ्या ठिकाणी टँकर उलटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी खेड व पोलादपूर हद्दीत घडली.
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दोन वेगवेगळ्या ठिकाणी टँकर उलटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी खेड व पोलादपूर हद्दीत घडली. या अपघातात दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले. खेड हद्दीत रसायनाचा टँकर उलटला. मात्र, कशेडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
टँकरचालक शिवकुमार केसालाल प्रसाद सादू (रा. मध्य प्रदेश) हा आपल्या ताब्यातील टँकर घेऊन लोटे ते न्हावाशेवा असा कशेडी घाटातून सायं. ६.१५ वाजताच्या सुमारास जात असता येलंगेवाडी जवळ एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून टँकर उलटला. यात चालक किरकोळ जखमी झाला असून पोलिसांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दुसरा अपघात खेड हद्दीत झाला. चालक पंकजकुमार केवळजी (रा. राजस्थान) हे टँकर घेऊन गुजरात ते लोटे असा जात होता. कशेडी गाव हद्दीत कशेडी आंबा येथे उतारावर चालकाचे नियंत्रण सुटून टँकर उलटला. यात चालक किरकोळ जखमी झाल्याने त्याला कळभणी येथे उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातानंतर टँकरमधील रसायनाची गळती होऊन रस्त्यावर वाहून गेले. या अपघाताची माहिती समजताच कशेडी पोलीस टॅपचे सहा. फौजदार मधुकर गमरे आदीनी घटनास्थळी धाव घेतली. खेड येथील अग्निशमन बंब पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली. कशेडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून, या घटनेची माहिती समजताच खेडचे पोलीस निरीक्षकांनीही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.