म्हसळा : शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या शहबाज घराडे यांच्या मालकीच्या कॉम्प्युटर दुरु स्तीच्या दुकानामध्ये चोरी झाल्याची घटना १९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. याबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी प्रकरणाचा तपास सुरू असताना दोघा जणांना रविवारी १९ मार्चला अटक करण्यात आली आहे.म्हसळा शहरात गजबजलेल्या ठिकाणी असणाऱ्या नगरपंचायत कार्यालयाशेजारी शहबाज घराडे यांचे कॉम्प्युटरचे साहित्य आणि दुरु स्तीचे दुकान आहे. २० जानेवारीच्या पहाटे ते दुकान उघडावयास गेले असता त्यांना दुकानातून कॉम्प्युटरचे साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानुसार म्हसळा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरु द्ध गुन्हा नोंद झाला होता. म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास चालू होता. अवघ्या दोन महिन्यांच्या कालखंडातच आरोपी युसुफ इस्माई गोलंदाज व जमीर सादिक दरोगे (दोघांचे वय साधारणपणे २० ते २५ वर्षे) यांना म्हसळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. या आरोपींकडून चोरी झालेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोन आरोपींपैकी युसुफ इस्माई गोलंदाजवर आधीच पुणे व म्हसळा पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या चोरट्यांकडून आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये सहा.पो. निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.सुनील गोविंद खंदारे, सूर्यकांत जाधव, वैभव पाटील, श्यामराव खराडे, सागर पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली. या चोरीच्या तपासामुळे सर्व स्तरांतून म्हसळा पोलिसांचे कौतुक होत आहे.(वार्ताहर)
दोन चोरटे अटकेत
By admin | Published: March 21, 2017 2:00 AM