सोनसाखळी चोरणारे दोघे गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 03:02 AM2018-11-14T03:02:29+5:302018-11-14T03:03:50+5:30
वडखळ पोलिसांकडून १५ लाख ७ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
जयंत धुळप
अलिबाग : दुचाकीवरून मंगळसूत्र व चेन लंपास करून फरार झालेल्या अजय जग्गू पुजारी आणि सुमित श्रीपाद निळगेकर (दोघे रा. बदलापूर) यांना कर्जत जवळच्या दामात गावात सापळा लावून अटक करण्यात आली. पेण उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखालील, वडखळ पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अजित शिंदे व त्याच्या सहकाऱ्यांच्या विशेष पथकास यश आले असल्याची माहिती रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.
शुक्रवारी दुचाकीवरून येऊन सोनसाखळी चोरणारे दोघे दुचाकीवरून पळून गेले होते, हे दोघे रायगड जिल्ह्यात वडखळ, पेण, पोयनाड, रेवदंडा, रोहा, कर्जत या ठिकाणी मोटारसायकल व स्विफ्ट कारने येऊन दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीचे गुन्हे करून पोलिसांना सतत गुंगारा देत होते. या दोघा चोरट्यांना पकडण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली होते. पथकातील सहा. पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत सोनसाखळी चोरी करणाºया या दोघा चोरट्यांबाबत माहिती मिळाली. त्याप्रमाणे सपोनि अजित शिंदे व त्यांच्या पथकाने बदलापूर, उडपी-कर्नाटक, गोवा आदी ठिकाणी जाऊन छापे घातले होते. तेथूनही या दोघांनी फरार होण्यात यश मिळविले होते. २८ आॅक्टोबर रोजी रात्री उशिरा हे दोघे पुण्यावरून एका चारचाकी वाहनातून कर्जत-नेरळ मार्गे बदलापूर येथे येणार असल्याची खात्रिशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे पथकाने कर्जत जवळच्या दामात या गावात सापळा लावला. अजय जग्गू पुजारी आणि सुमित श्रीपाद निळगेकर या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी प्राथमिक तपासात वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्यांची कबुली दिली. या गुन्ह्यांत त्यांना २९ आॅक्टोबर रोजी अटक करून पुढील तपास केला असता, त्यांनी वडखळ, पेण, पोयनाड, रेवदंडा, रोहा, कर्जत येथेही चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.
कल्याणचा समित प्रभाकर ठोसर तिसरा साथीदार
कल्याणमधील मधुकृष्ण को.आॅपरेटिव्ह ब्राम्हण सोसायटीमध्ये राहाणारा समित प्रभाकर ठोसर हा या दोघा चोरट्यांचा तिसरा साथीदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो चोरलेला माल विकत घेऊन त्यांची विल्हेवाट लावायचा. हे तिघेही गुन्हेगार चोरी करून परराज्यात पळून जात असल्याचे तपासात पुढे आले आहे. आतापर्यंत या तिघा आरोपींकडून रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे करण्यासाठी वापरलेली एक पल्सर मोटारसायकल, एक स्विफ्ट कार व एकूण २६१ ग्रॅम वजनाचे तब्बल पाच लाख ८२ हजार ७२५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण १५ लाख ७ हजार ७२५ रुपये किमतीचा मुद्देमाल वडखळ पोलिसांनी ताब्यात घेतला असून, पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अजित शिंदे हे करत आहेत.